यावल नगरपालिकेत नगराध्यक्ष बदलाचे वारे !

0

यावल : यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा शरद कोळी या जात प्रमाणपत्र प्रकरणी अपात्र ठरल्याने त्यांच्या रीक्त जागेसाठी 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात निवडणूक होत आहे. पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी फैजपूर असतील. नगराध्यक्ष पदावर नौशाद तडवी यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून या माध्यमातून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या गटाची शक्यता पुन्हा पालिकेत येणार असल्याचे राजकीय गोटातून बोलले जात आहे.

सुरेखा कोळी अपात्र ठरल्याने निवडणूक
यावल नगरपरीषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांना 29 नोव्हेंबर 2019 रोजी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी, जळगाव यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून अपात्र ठरविल्यानंतर रीक्त जागेवर पालिकेचे उपनगराध्यक्ष राकेश कोलते यांच्याकडे 9 डिसेंबर रोजी प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार सोपविण्यात आला होता. मात्र नूतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या 30 जूनच्या पत्रानुसार लोकनियुक्त नगराध्यक्ष अपात्र ठरविल्याने नूतन अध्यक्षपदाची निवड करणे आवश्यक असल्याने नियमांन्वये अध्यक्ष निवडीसाठी 14 रोजी विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने निवडून आलेल्या सदस्यांमध्ये एकमेव सदस्य नौशाद तडवी असल्याने त्यांची बिनविरोध निवड शक्य आहे. नामनिर्देशन स्वीकारण्याची मुदत 6 ते 7 जुलै अशी असून त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी तसेच उमेदवारी मागे घेता येणार आहे.

अतुल पाटील गटाची पुन्हा येणार सत्ता
नौशाद तडवी या प्रभाग क्रमांक तीन मधून अनुसूचित जमाती या महिला राखीव जागेवरून निवडून आल्या आहेत. यावल पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांच्या शहर विकास आघाडी गटाच्या त्या सदस्य असल्याने नगरपरीषदेवर पुन्हा अतुल पाटील यांच्या गटाचे वर्चस्व राहणार आहे.