यावल नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अपात्रतेबाबत लवकरच लागणार निकाल

0

जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी ; निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष

यावल- यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांच्या विरूध्द दाखल अपात्रतेप्रकरणी 12 रोजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या न्यायासनापुढे दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. अपात्रतेप्रकरणी लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार असून निकाल नेमका काय लागतो? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नगरसेवक अतुल पाटलांची याचिका
कोळी यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे या संदर्भातील याचिका 31 ऑगस्ट 18 रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे नगरसेवक अतुल पाटील यांनी दाखल केली होती. त्या अनुषंगाने 12 रोजी जिल्हाधिकारी यांच्या न्यायासनासमोर सकाळी 11 वाजता कामकाज चालले. जिल्हाधिकारी यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. वादी आणि प्रतिवादी यांच्या युक्तिवादानंतर जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाबाबत लवकरच निकाल देण्यात येईल, असे दोन्ही पक्षांना सांगितले. दरम्यान, यापूर्वी पालिकेचे दोन नगरसेवक अपात्र झाल्याने नगराध्यक्षांच्या सुनावणी कडे जिल्ह्याचे लक्ष लागलेे आहे.

दोन सदस्यांच्या अपात्रतेनंतर नगराध्यक्षांच्या निकालाकडे लागले लक्ष
शहर विकास आघाडीचे गटनेता अतुल पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार पालिकेत प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमातीच्या महिलेकरीता राखीव होते. तेव्हा शिवसेनेच्या वतीने सुरेखा शरद कोळी या दिनांक 27 नोंव्हेबर 2016 रोेजी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या तर कलम 9 (अ) नुसार राखीव जागेवर निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराने निवडणूक झाल्याच्या सहा महिन्यांच्या आत जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते मात्र अद्यापपावेतो त्यांनी वैद्यता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे अशी याचिका 31 ऑगस्ट 2018 रोजी अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी किशोेरराजे निंबाळकर यांच्याकडे दाखल केली होती. या प्रकरणात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांकडून या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल मांगवला होता. तेव्हा 12 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी प्राप्त अहवाल व दाखल तक्रार आणि प्रतिवादी नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांचे म्हणणे ऐकून घेतले. लवकरच निकाल देण्यात येणार आहे. तेव्हा या पुर्वीच पालिकेचे दोन सदस्यांना व्हीप झुगारल्या प्रकरणी 10 ऑक्टोंबरला जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले आहे व आता नगराध्यक्षांच्या संदर्भात दाखल अपात्रता प्रकरणी काय निकाल लागतो? याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.