जिल्हाधिकार्यांचा निर्णय : अतुल पाटील यांच्या लढ्याला यश
यावल : नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे यावल नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी गुरूवार, 26 रोजी अपात्र करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी अधिकारी अॅड.हरूल देवरे यांनी दिली. दरम्यान, नगरसेवक अतुल पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे.
याचिकेवरील अंतिम संरक्षण काढल्याने वाढल्या अडचणी
यावल पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी 2016 मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून विजय मिळवला होता. निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना मुख्याधिकार्यांनी नोटीस बजावली होती तर कोळी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील अंतरीम आदेशाचे संरक्षण नुकतेच काढण्यात आल्याने नगराध्यक्षा कोळी यांच्या अडचणी वाढल्या होत्या. जात प्रमाणपत्र सादर न केल्याने सीओंनी नगराध्यक्षांना नोटीस बजावली होती त्याविरुद्ध नगराध्यक्षांनी औरंगाबाद खंडपीठात 6902/17 या क्रमांकाने याचिका दाखल केली होती. त्यावर अपात्रतेची कारवाई करू नये, असा अंतरीम आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर नगरसेवक अतुल पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांकडे 30 ऑगस्ट 2018 रोजी नगराध्यक्षांना अपात्र करण्याची मागणी करून याचिका दाखल केली. या प्रकरणात उच्च न्यायालयातील याचिकेमध्ये कारवाई करू नये, असा मनाई हुकूम असल्याने त्यांना अपात्र करता येणार नाही, असा आदेश देऊन 3 जानेवारीला अर्ज निकाली काढला होता. या निर्णयाविरोधात अतुल पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका क्रमांक 1536/19 ने अपील दाखल केले होते तर उच्च न्यायालयात नगराध्यक्षा कोळी यांनी यापुर्वीच याचिका दाखल केली होती. दोन्ही याचिकांवर 7 ऑक्टोबरला सुनावणी झाली. त्यात नगराध्यक्षांच्या याचिकेवरील अंतीम संरक्षण काढून टाकण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरीम संरक्षण काढून घेतल्याने व सर्वोच्च न्यायालयाच्या 23 ऑगस्ट 2018 च्या निर्णयाचे कायद्यात रूपांतर झाल्याने नगराध्यक्ष सुरेखा कोळी या आपोआपच पदावर राहण्यास अपात्र झाल्याने जिल्हाधिकार्यांनी कोळी त्यांना अपात्र असल्याबाबत औपचारिक घोषणा करावी, अशी मागणी नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांनी केली होती. दरम्यान, जिल्हाधिकार्यांच्या निर्णयावर आपण समाधानी असल्याचे नगरसेवक अतुल पाटील म्हणाले.
निकालाविरोधात अपिलात जाणार -सुरेखा कोळी
जिल्हाधिकार्यांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही, या निर्णयाविरोधात आम्ही अपिलात जाणार असून आम्हाला निश्चित न्याय मिळेल, असे माजी नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी सांगितले.