यावल। काँग्रेसच्या पाठबळावर विजयी झालेल्या पंचायत समितीच्या सभापती संध्या किशोर महाजन यांना पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये महाराष्ट्र स्थानिक संस्था सदस्य अनर्हता अधिनियमांतर्गत पंचायत समिती सदस्यपदी अपात्र ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी घेतल्याने शहर व तालुक्यातील राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
मी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करीत यावल पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून निवडून आले होते व गटनेता यांनी बजावलेला व्हीप आपल्यापर्यंत पोहोचला नव्हता मला प्रत्यक्ष व्हीपबाबत माहित नव्हते. पक्षांच्या व्यक्तीऐवजी अपक्ष उमेदवाराला भाजपने सभापतीपद देणे हा आपल्यावर अन्याय होता. या निर्णयाच्या विरोधात आपण अपिलात
जाणार आहे. -संध्या किशोर महाजन, सभापती यावल, पंचायत समिती
काँग्रेसचा पाठिंबा घेत मिळविले होते सभापतीपद
मार्च 2017 मध्ये यावल पंचायत समिती सभापती निवड झाली होती. तेव्हा भाजपने अपक्ष उमेदवार पल्लवी चौधरी यांना सभापतीपदाची उमेदवारी देऊन पक्षाच्या पाच सदस्यांनी त्यांना मतदान करावे, असा व्हीप बजावला होता. संध्या महाजन या भाजपकडून निवडलेल्या सदस्य होत्या त्यामुळे त्यांनाही भाजपने व्हीप बजावून पल्लवी चौधरींना मतदानाचा आदेश दिला होता मात्र सभापती निवडणुकीपूर्वी संध्या महाजन यांनी ऐनवेळी काँग्रेसचा पाठींबा घेत स्वतःच सभापती पदाची उमेदवारी केली आणि त्यांनी पल्लवी चौधरींचा पराभव करीत सभापतीपद जिंकले होते. यामुळे ‘भाजप जिंकली व भाजप हरली’ असे म्हणण्याची वेळ आली होती.