यावल पालिकेची सर्वसाधारण सभा गाजली

0

खडसे परीवाराविषयी अपशब्द वापरणार्‍यांच्या निषेधावरून सत्ताधारी व विरोधकांत जुंपली

यावल:- नगरपालिकेची विविध विषयांवरील मासिक सभा सोमवारी चांगलीच गाजली. सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी खडसे परीवारा विरूध्द अश्लिल भाषेचा प्रयोग करून महिला दिनी महिलांचा अनादर केला म्हणून या घटनेचा निषेध सभागृहाने करावा या वरून सत्ताधारी व विरोधकात जुंपली मात्र सभेच्या अध्यक्षा नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी विरोधकांना हा विषय पालिकेचा नाही असे सांगत सभा पुढे सुरू केली. सभेच्या पटलावर 61 विषय ठेवण्यात आले होते. साने गुरूजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशव्दारासह घनकचरा वाहतूकदारांचा कंत्राटाची मुदतवाढ देण्याच्या विषयावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये चर्चेचे चांगलेच उणे-दूणे काढण्यात आले. सभेत सर्व विषय मंजूर करण्यात आले. प्रभारी मुख्याधिकारी सुवर्णा ऊगले उपस्थित होत्या.

अनेक विषयांना विरोधकांनी नोंदवला आक्षेप
शहरातील विविध विकास कामासंदर्भात येथील नगरपालिकेची सोमवारी मासिक सभा झाली. नगरपालिका संचलीत साने गुरूजी माध्यमिक शाळेचे जीर्णावस्थेतेतील इमारत पाडून नवीन बांधकाम करणे बाबतच्या विषयांमध्ये शाळेच्या स्थापनेपासून पुर्वेकडील प्रवेशव्दार बंद करणे आणि पश्चिमेकडीलव्दार सुरू करण्यावरील विषयावर माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे कारणीमिमांसा स्पष्ट केली मात्र त्यास अतुल पाटील यांनी तीव्र विरोध दर्शविला आणि पुर्वेकडील व्दार मुख्यव्दार म्हणून राहिले पाहिजे, असा आग्रह धरला असता यावर अध्यक्षांनी मतदान घेण्याचे सुचविले असता विरोधी गटाचे सहा सदस्यांनी हात उंचावून त्यास विरोध दर्शविला मात्र तो बहुमताने मंजूर करण्यात आला तर मॅक्रो इनव्हारेमेंट सोल्युशन या कंपनीचा गेल्या वर्षात सुरू असलेला घनकचरा वाहतूक व व्दार-व्दार संकलन कंत्राटदाराची मुदत पुन्हा या वर्षभरासाठी वाढवावी या विषयावर अतुल पाटील, राकेश कोलते यांनी विरोध दर्शविला त्याचे कारण स्पष्ट करतांना कंत्राटदाराविषयी स्वच्छता निरीक्षकांनी नागरीकांकडून आलेल्या तक्रारीची मुख्याधिकारी यांच्याकडे दोनदा लेखी बाजु मांडली असल्याचे सभागृहाचे निर्दशनास आणून दिले. शहराच्या विस्तारीत पाणीपुरवठा योजनेसाठी तालुक्यातील मोर धरणावरून पाणी आणण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या विषयासही पाटील यांनी विरोध दर्शवून या महागड्या योजनेपेक्षा पालिकेने मंजूर केलेल्या साठवण तलावाशेजारीच दुसरा साठवण तलाव केल्यास जुन्या तलावाची दुरूस्ती तसेच पाण्याची क्षमता कमी खर्चात होणार असल्याचेही सभागृहाचे निर्दशनास आणून दिले. आदिवासी तडवी वसाहतीतील गटारी होण्यासाठी पालिकेने तात्काळ निधी मंजूर करावा, अशी सभागृहास विनंती केली. चर्चेत माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे, अतुल पाटील उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, राकेश कोलते, नौशाद तडवी, शे.असलम शे.नबी, मनोहर सोनवणे, रुख्माबाई महाजन यांनी सहभाग घेतला.

सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कुटूंबाविषयी अश्लील बोलण्याप्रकरणी नगरसेवक सुधाकर धनगर यांचा सभागृहाने निषेध नोंदवावा, अशी मागणी नगरसेवक अतुल पाटील, राकेश कोलते, पौर्णिमा फालक, देवयानी महाजन, रुख्माबाई भालेराव, नौशाद तडवी यांनी मागणी केली असता विषय पत्रिकेवर हा विषय नसल्याचे सांगून नगराध्यक्षा कोळी यांनी ही सुचना फेटाळून लावली. अप्रिय घटनेचा निषेध, चांगल्या कामाचे अभिनंदन, श्रध्दांजली हे विषय पत्रिकेवर नसतांना सभागृहास तसे ठराव करण्याचे अधिकार असतात, असे पाटील यांनी सुचविले मात्र त्यास सभागृहाने दाद दिली नाही.

सभागृहात येण्यासाठी पत्रकारांना मज्जाव
नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी सभागृहात पत्रकारांना येवू देवु नका, अशा सुचना पालिका कर्मचार्‍यांना दिल्या होत्या व एका पत्रकारास फोटोदेखील काढू नका, असे सभागृहात सांगितले तेव्हा सभा संपल्यावर संबधीत पत्रकाराने त्यांना विचारले असता तेव्हा नगराध्यक्षांनी सांगितलेे की पत्रकारांनी सभेेचा एकच मुख्य फोटो घ्यावा, त्यावर मुख्य म्हणजे आपला फोटो न घेता इतर फोटो घेतात, असे योग्य नाही असे त्यांनी सांगितले.