यावल : पालिकेच्या ठरावानुसार कामे न करणे, संबंधित कामांची कागदपत्रे आढळून न येणे तसेच कामकाजात सतत हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केल्याने नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता एस.ए.शेख यांन मुख्याधिकारी बबन तडवी यांनी निलंबीत केल्याने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विविध प्रकरणात ठपके ठेवून निलंबन
बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांसंबंधीचे जे देयके ठेकेदारांना
प्रदान करण्यात आलेली आहे त्या संबंधित जे लेखा परीक्षणात आक्षेप नोंदविण्यात आले त्याबाबतची पूर्तता न करणे, कारणे दिलेल्या पत्रांचा खुलासा न करणे आदी कारणावरून शेख सईद शेख अहमद यांना मुख्याधिाकारी बबन तडवी यांनी निलंबीत केले. कानतोडीच्या नाल्यातील अनधिकृत संरक्षण भिंतीचे बांधकाम, वसुंधरा अभियानाचे अनियोजीत काम, तसेच जलसंवर्धनाच्या विविध कामात त्यांनी हलगर्जीपणा करून दिलेल्या पत्राचे खुलासे न केल्याबद्यल महाराष्ट्र नगरपरीषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1865चे कलम 79 व महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम1979 मधील तरतुदीनुसार मुख्याधिकारी बबन तडवी यांनी निलंबनाचे आदेश बजावले आहेत. चौकशीअंती जे नव्याने दोषारोप समोर येतील त्याबाबातही आपणास नव्याने आदेश बजवण्यात येतील, असे आदेशात नमूद आहे. दरम्यान, निलंबनाच्या कारवाईनंतर पालिकेत काम न करणार्या कर्मचार्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.