अपघातात डोक्याला दुखापत झाल्यानंतर मुंबईत सुरू होते उपचार
यावल- नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक बशीर मोमीन यांचे शुक्रवारी मुंबईत उपचार सुरू असताना निधन झाले. 10 ऑक्टोबर रोजी बशीर मोमीन यांचा दुचाकीवरून घसरुन किरकोळ अपघात झाला होता. त्यात त्यांना डोक्याला दुखापत झाल्यानंतर भुसावळसह जळगाव आणि मंगळवारपासून त्यांना मुंबईला उपचार दाखल करण्यात आले होते. नगरपालिकेत मोमीन यांची तिसरी टर्म होती. त्यांच्या पत्नी हुसेनाबी बशीर मोमीन नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष आहेत. शहरात मोमीन हे दुचाकीवरून फिरायचे. 10 ऑक्टोबर रोजी ते डांगपुरा भागातील मोमीन वाड्यातून दुचाकीवरून जात असताना दुचाकी घसरून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुंबईत रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परीवार आहे.