राजकारण पुन्हा तापले ; दीर्घ काळानंतर शशांक देशपांडे राजकारणात सक्रिय
यावल- यावल पालिकेच्या राजकारणात पुन्हा वातावरण तापले आहे. सत्ताधारी गटातील दोन नगरसेवक अपात्र झाल्यानंतर नगराध्यक्षांच्या अपात्रता याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. हा निकाल जाहीर होण्याअगोदरच पालिकेचे काँग्रेस नगरसेवक शेख असलम शेख नबी यांच्याविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आल्याने यावलच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नगरसेवक पदावर असताना आपल्या पत्नी शाहिस्ता परवीन यांच्या नावावर असलेल्या जागेवर अल्प स्वरूपाची बांधकाम परवानगी घेवून त्यापेक्षा अधिक बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे तर त्यांना अपात्र करण्यात यावे, असा जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे शशांक देशपांडे यांनी सादर केला आहे. दीर्घकाळ राजकारणापासून लांब राहिलेले देशपांडे पुन्हा सक्रीय झाले आहे. या अपात्रतेच्या याचिकेमुळे गुलाबी थंडीत यावल पालिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे.
काँग्रेसला मिळाला घरचा अहेर
पालिकेत शिवसेनेच्या सुरेखा कोळी नगराध्यक्ष असून उपनगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचे प्रा.मुकेश येवले विराजमान. विशेष म्हणजे राष्ट्रवादीला उपनगराध्यक्ष पदाकरीता शहरातील काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी समर्थन दिले होते त्यामुळे हा अपात्रतेचा प्रस्ताव घरचा आहेरच म्हणावा लागेल, अशी उपसाहात्मक टिका आता होवू लागली आहे.