व्हीप झुगारल्याचा फटका ; जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने खळबळ
यावल- नगरपालिकेच्या शहर विकास आघाडी व महर्षी व्यास शहर विकास आघाडीच्या गटातून फुटून सत्ताधारी गटात सहभागी झालेल्या दोन नगसेवकांना व्हीप झुगारल्याप्रकरणी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळक यांनी यांनी गुरुवारी अपात्र केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुधाकर आनंदा धनगर व रेखा युवराज चौधरी अशी अपात्र झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत.
व्हीप झुगारल्याचा नगरसेवकांना फटका
यावल नगरपालिकेतील शहर विकास आघाडीचे गटनेते व माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या 15 जानेवारी 2018 रोजी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत सुधाकर धनगर यांना व देवयानी महाजन यांना पाणीपुरवठा सभापती पदासाठी सूचक किंवा अनुमोदक होण्यासाठी व त्यांना निवडून आणण्यासाठी पक्षादेश बजावला होता मात्र धनगर यांनी पक्ष आदशाचे उल्लंघण करून स्वतः पाणीपुरवठा सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे पक्ष आदेशाचे उल्लंघन झाल्याने त्यांना अपात्र करण्यासाठी 5 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला. महर्षी व्यास शहर विकास आघाडीचे गटनेते राकेश कोलते यांनी त्यांच्या गटातील नगरसेविका रेखा युवराज चौधरी यांना पक्षादेश बजावलत सभापती निवडणुकीत रुख्माबाई भालेराव यांना सूचक किंवा अनुमोदक होण्यासाठी पक्षादेश दिला मात्र रेखा चौधरी यांनी रुक्माबाई भालेराव यांना सुचक तर काँग्रेसच्या सईदाबी शेख हारून यांना अनुमोदक म्हणून स्वाक्षरी दिल्याने पक्ष आदेशाचे उल्लंघण झाल्याने गटनेते राकेश कोलते यांनी जिल्हाधिकार्यांकडे रेखा चौधरी यांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने सुनावणी पूर्ण होऊन गुरुवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रेखा चौधरी यांना अपात्र घोषित केले. अतुल वसंतराव पाटील व राकेश कोलते यांच्यातर्फे अॅड. विश्वासराव भोसले यांनी कामकाज पाहिले.
स्वार्थासाठी कोलांट-उड्या मारणार्यांना धडा अतुल पाटील
नगरपरीषद निवडणुकीत निवडून आल्यानंतर गट स्थापन करण्यात आला होता. त्यामुळे आघाडीच्या गटनेत्यांनी दिलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे आवश्यक होते व आघाडी सोबत राहणे आवश्यक असतांना मात्र स्वतःच्या राजकीय व आर्थिक फायद्यासाठी शहर विकास आघाडी व महर्षी व्यास विकास आघाडीशी गद्दारी करणार्या व पर्यायाने मतदारांची फसवणूक करून सत्ताधारी गटात सामील झालेल्या गद्दार नगरसेवकांना या निकालामुळे धडा मिळाल्याचे नगरसेवक अतुल पाटील म्हणाले. आयाराम-गयाराम नगरसेवकांना देखील या निकालामुळे चाप बसणार असल्याचेही त्यांनी सांगत निकालामुळे समाधानी असल्याचे सांगितले.