यावल पालिकेत करवाढी विरोधातील हरकतींवर सुनावणी

0

नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी ऐकली नागरीकांची बाजू

यावल- पालिकेत शुक्रवारी नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी करवाढी विरोधात दाखल हरकतींवर सुनावणी घेतली. प्रभारी रचनाकार व आरेखक अशा दोन सदस्यांच्या पथकाने हरकती दाखल करणार्‍या नागरीकांची बाजू जाणून घेतली. सुनावणीअंती पालिकेच्या दोन गटनेत्यांसह सात नगरसेवकांनी दिलेले करवाढीविरोधातील निवेदन मुख्याधिकार्‍यांनी पथकाला दिले. त्यामुळे पुढील निर्णयाकडे शहरवासीयांचेे लक्ष लागले आहे. गेल्या अर्थसंकल्पात यावल पालिकेने मालमत्ता करातील चतु:वार्षिक फेरआकरणीत पाच टक्के वाढीव घरपट्टी लावली होती. त्या विरोधात शहरातून 432 हरकती पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींवर जळगाव येथील नगररचना विभागाच्या सहायक संचालक कार्यालयातील प्रभारी नगर रचनाकार दिव्यांक सोनवणे, सहाय्यक आरेेखक बालकराम बावस्कर यांनी सुनावणी घेतली. दुष्काळाचा मुद्दा उपस्थित करत नागरीकांनी करवाढीला विरोध केला. मुख्याधिकारी रविंद्र लांडे, कर निरिक्षक एस. पी. बयाणी, वसुली अधिकारी एस.बी.उंबरकर उपस्थित होते. लवकरच नगर रचना विभागाकडून करवाढीसंदर्भात निर्णय जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती पथकाने पथकाने दिली.

अतुल पाटील, राकेश कोलते यांनी दिले निवेदन
पालिकेचे गटनेता अतुल पाटील व राकेश कोलते, नगरसेवक शेख असलम शेख नबी, देवयानी महाजन, पौर्णिमा फालक, नौशाद तडवी व रूख्माबाई भालेराव- महाजन यांनी करवाढ रद्द करण्याबाबत पालिकेला निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत नगर रचना विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली.