भुसावळ। यावल तालुक्यातील दहिगाव येथून शेतकर्याची 35 हजार रुपये किंमतीची म्हैस लांबवणार्या सावखेडासीम (ता.यावल) येथील चोरट्यांना यावल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या अटकेनंतर या भागातील पशूधन चोर्यांचा उलगडा होण्याची आशा आहे. तक्रारदार शेतकरी प्रकाश मन्साराम पाटील (दहिगाव) यांच्या मालकीची 35 हजार रुपये किंमतीची म्हैस 7 ऑगस्टच्या मध्यरात्री खळ्यातून चोरट्यांनी लांबवली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल होता.
गुप्त माहितीवरुन पोलिसांनी केली कारवाई
पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच गुप्त बातमीदाराने एका शेतात चोरीची म्हैस बांधली असल्याची व ती विक्री करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर मुस्तफा अन्वर तडवी व भिकारी कालू तडवी (सावखेडासीम) यांना अटक करण्यात आली तसेच शेतातून म्हैसही ताब्यात घेण्यात आली. आरोपींना गुरुवारी यावल न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलीस ठाणे आवारातच बांधली म्हैस
पोलीस दप्तरी दाखल गुन्ह्यात पशू वा पशूधनाची चोरी झाल्यानंतर गुन्ह्याचा उलगडा झाल्यानंतर या प्राण्यांना कुठे ठेवावे याबाबत कुठलीही तरतूद नाही त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेली म्हैस यावल पोलीस ठाण्याच्या आवारातच बांधण्याची वेळ आली. तक्रारदार शेतकरी प्रकाश पाटील यांनी गुरुवारी चारा-पाण्याची व्यवस्था केली. न्यायालयाच्या आदेशानंतर म्हशीचा ताबा शेतकर्याला दिला जाणार आहे.