यावल- शहरातील धनगर वाड्यात दोन गटांमध्ये मारहाण झाल्याची घटना 2017 मध्ये घडली होती. या प्रकरणी यावल न्यायालयाने चौघा आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व 23 हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. धनगर वाड्यात आरोपी खटाबाई माधव धनगर, अभिमान धनगर, सागर धनगर व संजय धनगर यांनी प्रदीप सुकलाल धनगर यास लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. यावल न्यायालयाने चौघांना वेगवेगळ्या कलमानुसार दोषी ठरवले. सर्व आरोपींनी किरकोळ कारणावरून फिर्यादी प्रदीप याला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. यावल पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकारी वकील अॅड. नितीन खरे यांनी एकूण आठ साक्षीदार सरकारतर्फे तपासले. फिर्यादी, साक्षीदार, पंच, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
चौघा आरोपींना शिक्षा
या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांनी केला. न्यायाधीश डी.जी.जगताप यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी सागर संजय धनगर याला कलम 326 नुसार तीन वर्षे सक्तमजुरीची व 10 हजार रूपये दंडाची शिक्षा दिली. एकूण 23 हजार रुपये दंडाच्या रकमेतून 15 हजार रुपये फिर्यादी प्रदीप धनगर याला अपील कालावधी नंतर देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पैरवी अधिकारी ऊल्हास राणे व केस वॉच अलीम शेख यांनी मदत केली. आरोपीतर्फे अॅड. जगदीश कापडे यांनी काम पाहिले.