पोलीस अधिकार्याच्या फेरचौकशीचे वरीष्ठांनी दिले आश्वासन
यावल- अडावद, ता.चोपडा येथील पोलिस अधिकार्यासह एका पोलिस शिपायावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एका पोलीस कर्मचार्याच्या पत्नीसह तीन महिलांचे येथील पोलीस ठाण्यासमोर गेल्या सात दिवसापासून उपोषण सुरू होते. तक्रारीची अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्याकडून फेरचौकशी करण्याचे आश्वासन दिल्यावर उपोषणाची सांगता करण्यात आली. आमदार हरीभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणार्थी महिलांसह एम.बी.तडवी, मुनाफ तडवी, आर.पी.आय.चे अरुण गजरे चर्चेत सहभागी झाले होते.
अधिकार्याने विनयभंग केल्याचा आरोप
तालुक्यातील मोहराळा येथील 40 वर्षीय विवाहितेचे पती अडावद पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी विवाहिेच्या घरी जावून विनयभंग केला होता. त्यानंतर विवाहिता पतीच्या औषधासाठी यावलला आली असता येथील बुरूज चौकात शिपाई कदीर शेख यांनी सहाय्यक निरीक्षक हिरे यांचा निरोप दिला होता. यावरून पोलिस कर्मचार्याच्या पत्नीने 24 जुनला येथील पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द तक्रार दिली होती. तक्रारीची पोलिस अधिकार्यांच्या उपस्थितीत चौकशी झाली मात्र चौकशी निष्पक्ष झाली नसल्याचा पीडीत महिलेचा आरोप आहे.
दिड महिना होवूनही पोलिस गुन्हा दाखल करीत नसल्याने 13 ऑगष्टपासून पिडीत महिलेसह तीन महिलांनी येथील पोलिस ठाण्यासमोर उपोषणास सुरवात केली होती. दरम्यान उपोषणार्थी महिलांची प्रकृती खालावली होती मात्र उपोषणार्थी महिलांनी उपचारार्थ दाखल होण्यास नकार दिल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी उपोषणस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते.आमदार हरीभाऊ जावळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सातव्या दिवशी उपोषणाची सांगता झाली. प्रसंगी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांच्यासह आदिवासी बांधव व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.