यावल येथील क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामास गती द्या

0

यावल। तालुका तेथे क्रीडा संकुल असे धोरण राज्य सरकारने स्विकारले असले तरी आजही यावल तालुक्यात क्रीडा संकुलाचे कामे सुरु होवू शकले नाहीत. जिल्ह्यात यावल तालुका क्रीडा संकुलाची जागा उपलब्ध होवून सुध्दा याच्या कामास सुरुवात केली जात नसल्यामुळे शासनाने त्याकडे लक्ष देण्याची मागणी मनसे शहराध्यक्ष चेतन अढळकर यांनी जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे केली आहे.

त्रिस्तरीय क्रीडा संकुल उभारणीचे धोरण
राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. यासाठी त्रिस्तरीय क्रीडा संकुलाची उभारणी करण्याचे धोरण राज्य सरकारने स्विकारले आहे. यात विभागीय स्तर, जिल्हा स्तर आणि तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचा समावेश आहे.

शासनातर्फे 1 कोटी रुपयांची तरतूद
ग्रामीण भागातील व शहरातील होतकरु मुलांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध व्हाव्यात हा या धोरणामागचा उद्देश आहे. मात्र जिल्हास्तरावरील क्रीडा संकुलाची कामे मार्गी लागली असली तरी तालुकास्तरीय क्रीडा संकुले मात्र अनेक ठिकाणी रखडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काही काळ निधीच्या अडचणीमुळे यावल तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचे काम लांबले आहे. राज्य सरकारच्या निधीत 2009 मध्ये एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

4 हेक्टर्स जागा मंजूर
तालुक्यात प्रशस्त क्रिडा संकुल नसल्यामुळे खेळाडूंना नियमित सराव करणे शक्य होत नाही. त्यामुळे खेळाडू शाळेच्या मैदानावर वेळ मिळेल त्यानुसार सराव करतात. मात्र तालुका क्रीडा संकुलासाठी 4 हेक्टर 61 आर जागा मिळाली आहे. तरी गेल्या चार वर्षांपासून यासाठी पाठपुरावा केला नसून लोकप्रतिनिधी व प्रशासकीय पातळीवरुन पाठपुरावा करण्याची आवश्यकता असून या संकुलाचे काम पूर्ण झाल्यास तालुक्यातील खेळाडूंना हक्काचे मैदान उपलब्ध होऊ शकेल त्ंयामुळे वर्षभरात काम मार्गी लावण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.