यावल। येथील पंचायत समितीमधील पशुधन कार्यालयातर्फे शेतकर्यांना 50 टक्के अनुदानावर कडबा कुट्टी यंत्रांचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत तालुक्यात 80 यंत्रे वितरित झाली असून पुन्हा 12 यंत्र विभागास प्राप्त झाली आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्य शासनाचा 25 तर केंद्र शासनाचा 75 टक्के हिस्सा असलेली कडबा कुट्टी यंत्रे 50 टक्के अनुदानावर पशुधन पालक शेतकर्यांना दिली जात आहे. दोन एच.पी.क्षमतेचे आणि विजेवर चालणारे यंत्र शेतकर्यांसाठी लाभदायी आहे.
शेतकर्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
शेतकर्यांनी शेतकर्यांना आपल्या जोड धंद्यात काही प्रमाणात का होईना मदत होऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून अनुदानावर अशा प्रकारे विविध शेती वापरासाठी आवश्यक असलेली यंत्र सामुग्री, विद्युत पंप, फवारणी पंप यासह इतरही साहित्य वेळोवेळी शेतकर्यांना देण्यात आले आहेत. याचा फायदा अल्पभूधारक शेतकर्यांना झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवहन पुशधन विकास अधिकारी डॉ. एस.एन. बढे, पर्यवेक्षक व्ही. पी. पाटील यांनी केले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी पंचायत समिती कार्यालयात यंत्र खरेदी करण्यासाठी मागणी अर्ज सादर करण्याची आवश्यकता आहे. तसेच यासह संबंधित शेतकर्यांकडे पशु असल्याचा स्थानिक पशुधन वैद्यकीय अधिकार्यांचा दाखला शेतकर्यांनी सादर करणे आवश्यक आहे. यानंतर 15 हजार 450 रुपयांचे यत्र 7 हजार 725 रुपयात मिळते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समितीच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.