यावल येथे घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास

0

यावल । शहरातील मदिनानगर भागात रात्रीच्या सुमारास दरवाजाचा कडीकोंडा तोडून 2 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. येथील रहिवासी किफायतउल्ला अब्दुल पिंजारी (वय 38) यांच्या राहत्या घराचा कडीकोंडा काही अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची पाच तोळ्याची सोन्याची पोत, 20 हजार रुपये किंमतीच्या 40 भार, चांदीच्या फुलतोडे जोडी, 15 हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, 15 हजार रुपयांची एक ग्रॅम वजनाची पाच सोन्याच्या अंगठ्या, 12 हजार रुपयांची चांदीची चैन, तीन हजार रुपये रोख असा ऐवज लंपास करण्यात आला. याबाबत यावल पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय तांदळे करीत आहे.

कृषी साहित्याची चोरी
शहरातील सामाजिक वनीकरण परिक्षेत्रातील कार्यालयात असलेल्या विजेच्या केबलसह इतर साहित्य लंपास करण्यात आले आहे. याबाबत यावल पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण कार्यालयातून रात्रीच्या सुमारास 11 हजार रुपयांची 300 मीटर केबल वायर, 750 रुपयांचे 25 लोखंडी टिकाव, 300 रुपयांचे 6 लोखंडी तगारी असा एकूण 12 हजार 50 रुपयांचे साहित्य लंपास झाले आहे. याबाबत दगडू बुर्‍हान तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार विठ्ठल धनगर करीत आहे.