यावल येथे प्रकल्पग्रस्तांच्या आमरण उपोषणाला सुरुवात

0

यावल । अनुकंपातत्वावर नोकरी न मिळालेल्या जणांनी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या सहकार्याने शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून वर्ग 4 च्या पदासाठी अर्ज करून आणि शासन आदेश असताना देखील सेवेत घेतले नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावल प्रकल्प कार्यालयात काही जण अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी वणवण भटकंती करत आहेत. मात्र, विनंती अर्ज, आंदोलन अथवा उपोषण करूनही पोकळ आश्वासनांच्या पलिकडे त्यांच्या पदरी काहीही पडलेले नाही.

प्रकल्प कार्यालयाकडून उडवाउडवीची उत्तरे
सर्व उमेदवारांनी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या पाठबळावर सोमवार 7 रोजी पासून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांनी प्रकल्प अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात विभागाकडून केवळ वेळ मारुन नेणे सुरू असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. नोकरीविषयी प्रकल्प कार्यालयात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देवून अपमानीत केले जाते, असाही आंदोलकांचा आरोप आहे.

उपोषणात यांचा आहे सहभाग
दरम्यान, मनोज किशोर उजडेकर, भारती सुनील चौधरी, दौलत गुलाब भिल्ल, नीलेश रज्जाक तडवी, विनायक नामदेव शिरसाड, रौनक गंभीर तडवी, अल्लाद्दीन सरदार तडवी, लुकमान तुराब तडवी न्याजोद्दीन इतबार तडवी यांनी उपोषण सुरू केले.

लेखी हमी दिली
आरपीएफ सहायक प्रकल्प अधिकारी एम.पी.राणे यांनी मंचचे राज्याध्यक्ष एम.बी. तडवी, उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. सकारात्मक निर्णयाची लेखी हमी दिली. मात्र, जोपर्यंत सेवेत घेण्याचे आदेश निघणार नाही, तोपर्यंत आंदोलन कायम ठेवू, असे आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने सांगण्यात आले. मे 2014 मधील शासन निर्णयानुसार अनुकंपा नियुक्ती भरती 2012 पासून एकुण जागांच्या 10 टक्के मर्यादेने करण्याचे आदेश आहेत. मात्र, मे 2015 मध्ये 56 पदे रिक्त असतांना केवळ पाच उमेदवार घेण्यात आले. 10 ऐवजी 5 टक्के केलेली भरती गैर असून चौकशीची मागणी होत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.