यावल रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात

डांबर नसल्याने दिड महिन्यांपासून कामाला लागला होता ब्रेक : दोनदा निघाली निविदा

भुसावळ : गेल्या वर्षभरापासून उपेक्षित असलेल्या यावल रस्त्याच्या कामाला सोमवार, 1 फेब्रुवारी रोजी सुरूवात झाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले होते मात्र अवघ्या दोन दिवसात डांबर नसल्याचे निमित्त करून ठेकेदाराने काम बंद पाडल्याने वाहनधारकांसह नागरीकांनी आश्‍चर्य व संताप व्यक्त केला होता. या गंभीर प्रकाराची आमदार संजय सावकारे यांनी दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधून ठेकेदार काम करीत नसल्याने अन्य ठेकेदाराला काम द्यावे, असे बजावले होते शिवाय या संदर्भात स्वतंत्र बैठकही घेतली होती. अखेर ठेकेदाराने ही बाब गांभीर्याने घेत मंगळवार, 16 मार्चपासून यावल रस्त्याच्या कामाला सुरूवात केल्याने समाधान व्यक्त होत आहे. रस्ता कामाचा दर्जा राखला जावा, अशी अपेक्षा यानिमित्ताने बोलली जात आहे.

एकाच ठेकेदाराला मिळाले पुन्हा काम
यावल रस्त्याच्या दोन हजार 300 मीटर अंतराच्या रस्त्याचे काम गत अर्थसंकल्पात मंजूर झाले होते शिवाय त्यासाठी एक कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापूर्वी या रस्ता कामाची निविदा काढूनही तांत्रिक अडचणींमुळे काम न झाल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया बोलावल्यानंतर त्याच ठेकेदाराला काम मिळाले मात्र वर्षभरानंतरही ठेकेदाराकडून काम होत नसल्याने आमदारांनी यासंदर्भात आवाज उठवताच रस्ता कामाला 1 फेब्रुवारी रोजी सुरूवात झाली मात्र कामाच्या दोन दिवसानंतर ठेकेदाराने डांबर नसल्याचे कारण पुढे करीत काम बंद केल्याने नाराजी व्यक्त होत होती.

असे होणार डांबरीकरण
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोरील यावल रस्त्यापासून तापी नदीपर्यंतच्या एकूण दोन हजार 300 मीटर रस्त्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात येत आहे शिवाय त्यासाठी एक कोटी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामात तापी नदी पुलावर कारपेट टाकणे, स्मशानभूमीजवळील कामासह यावल रस्त्याच्या डांबरीकरणाचा समावेश आहे. कंत्राटदार वाय.एम.महाजन यांनी या कामाची निविदा घेतली आहे. किमान ब्रेक के बाद कामास सुरूवात झाली असलीतरी ठेकेदाराने दर्जेदार काम करावे व सार्वजनिक बांधकाम विभागानेही लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तर ठेकेदार बदलण्याची केली होती सूचना : आमदार
आमदार संजय सावकारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, संबंधित ठेकेदाराकडून काम होणे शक्य नसल्यास अन्य ठेकेदाराला हे काम द्यावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना करण्यात आली शिवाय या संदर्भात स्वतंत्र बैठक घेण्यात आली. दर्जेदार काम करण्याच्या सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले तसेच गांधी पुतळ्याजवळील खड्डेही बुजवण्यातील येतील, असेही ते म्हणाले.