यावल-रावेर तालुक्यातील वनदाव्यांची पुनर्पडताळणी

0

फैजपूर। यावल-रावेर तालुक्यार्तील वनहक्क समित्यांनी मध्यंतरी 1 हजार 800 वनदावे फेटाळले होते. मात्र, तपासणीत तांत्रिक दोषांमुळे अनेकांचे दावे फेटाळले गेले, असा मुद्दा काही संघटनांनी समोर आणला होता. या दाव्यांची आता वनहक्क कायद्यातील कलम 12 नुसार पुनर्पडताळणी होणार आहे. ही पुनर्पडताळणी कशी होणार? याचा दहा दिवसात तारीखनिहाय आराखडा तयार करण्याची सूचना प्रांताधिकारी मनोज घोडे-पाटील यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत केली.

1 हजार 800 दाव्यांचा समावेश
प्रलंबित वनदाव्यांचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी घोडे-पाटील यांनी फैजपुरातील श्रीराम टॉकीजमध्ये महसूल, वनविभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि वनसमिती अध्यक्ष, सचिवांची बैठक घेतली. दरम्यान, सातपुड्यातील प्रलंबित वनदाव्यांचा विषय कळीचा मुद्दा ठरला आहे. यापूर्वी अनेकांना वनहक्क कायद्यानुसार उपजिविकेसाठी जंगलात वनपट्टे कसण्यासाठी मिळाले. मात्र, निकषात बसणारे 1800 दावे स्थानिक समित्यांनी फेटाळले होते. मात्र, तांत्रिक दोषांमुळेच हे दावे फेटाळले गेल्याने संबंधितांवर अन्याय झाला, अशी भूमिका काही संघटनांनी घेतली होती. यानुसार 1800 दाव्यांची लवकरच पुनर्पडताळणी होणार आहे. त्यासाठी 10 दिवसात सविस्तर आराखडा तयार करण्यात येईल. मंगळवारी प्रांताधिकारी घोडे-पाटील यांनी यावलचे तहसीलदार कुंदन हिरे, रावेरचे तहसीलदार विजयकुमार ढगे, रावेरचे वनक्षेत्रपाल आर.जी राणे, एम.डब्ल्यू.जाधव, जामन्या वन्यजीवचे व्ही.एम.पाटील, यावल बीडीओ यशवंत सपकाळे, रावेर बीडीओ सोनिया नाकाडे, नायब तहसीलदार पी.एस.धनगर यांच्यासह वनहक्क समिती अध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते. स्थानिक समित्यांनी दाव्यांची पुनर्पडताळणी केल्यानंतर त्याविषयी मार्चअखेर उपविभागीय समितीकडे अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतर निर्णय होईल. या गावांचा होता सहभाग बैठकीला जामन्या, गाडर्‍या, ऊसमळी, आंबापाणी, हरिपुरा, मोहराळा, लंगडाआंबा, गारखेडा, वाघझिरा, निंमड्या, मानापुरी, मोहमांडलीसह सातपुड्यातील वनहक्क समितीचे अध्यक्ष उपस्थित होते.