यावल रावेर तालुक्यातील वाळू माफियांकडून 65 लाखाचा दंड वसूल

0

प्रांताधिकारी डॉ अजित थोरबाले यांची कारवाई ; वाळू माफियांचे धाबे दणाणले; कारवाई सुरूच राहणार

फैजपूर (निलेश पाटील)- यावल-रावेर तालुक्यात अवैध वाळू माफीयांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. कुठलीही परवानगी न घेता ग्राहकांना अव्वाच्या सव्वा भाव देऊन ग्रहांकांची लूट सुरू होत असल्याचे प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबाले यांच्या लक्षात येताच अवैध वाळू माफियांवर कारवाईची बडगा उचलत यावल-रावेर तालुक्यातील वाळू माफियांकडून 9 महिन्यात तब्बल 65 लाख 50 हजारांचा रुपयाचा दंड महसूल खात्यात जमा झाला आहे. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

राजाश्रयाने अवैध वाहतुकीला बळ
यावल, फैजपूर, सावदा व रावेर या भागात अनेक वाळू माफिया ठेकेदार झाले आहे. वाळू विक्री करीत असल्याचा कुठलाही परवाना नसतो त्यातच लाखो रुपयांचा महसूल शासनाला भरत नसल्याने राजकीय पुढार्‍यांच्या भरोसे हे वाळू माफिया नदीतून अवैध वाळू, मुरूम, खरवा, खडी, माती व अवैध रेतीसाठी ट्रक व टॅक्टर यातून दिवसा व रात्री वाहतूक करतात. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबाले यांच्या थेट कारवाईने महसूल खात्यात नऊ महिन्यात तब्बल 65 लाख 50 हजार रुपयांचा दंडापोटी महसूल जमा झाला आहे. या कारवाईत डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, यावल तहसीलदार विजयकुमार ढगे, रावेर तहसीलदार कुंदन हिरे तलाठी व पोलीस प्रशासन सहभागी झाले.

रात्री होती वाळू माफियांकडून वाहतूक
गिरणा, तापी व मोर नदीतून वाळू व अवैध उत्खनन हे सर्रास खुलेआम सुरू होते मात्र प्रांताधिकारी डॉ.थोरबाले यांच्या कारवाईने आता रात्री आमोदामार्गे वाहतूक सुरू असते. वाळू वाहतूक यात ठेकेदार पाच किलोमीटर आधी रस्त्याची पाहणी करतो त्यानंतर कोणी अधिकारी नसल्यास चालकाला फोन वाहतुकीची सूचना केली जाते

यावल तालुक्यातील वाळू माफियांवर झालेली कारवाई
कारवाई वाहन संख्या 21, अपेक्षित दंडत्मक रक्कम 16 लाख 54 हजार, वसूल केलेली रक्कम 12 लाख 85 हजार, शिल्लक वसुली तीन लाख 69 हजार, सोडलेल्या वाहनांची संख्या 17 व ताब्यात असलेल्या वाहनांची संख्या चार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रावेर तालुक्यातील वाळू माफियांवर झालेली कारवाई
कारवाई वाहन संख्या 19, अपेक्षित दंडत्मक रक्कम 48 लाख 50 हजार, वसूल केलेली रक्कम 21 लाख 12 हजार, शिल्लक वसुली 27 लाख 4 हजार, सोडलेल्या वाहनांची संख्या 11 व ताब्यात आलेली वाहनांची संख्या 18 याप्रकारे रावेर तालुक्यातील वाळू माफियांवर कारवाई करण्यात आली.

दंड न भरलेल्या वाळू माफियांच्या जमिनीवर बोजे बसवणार
वाळूचा लिलाव बंद असतांना यावल-रावेर तालुक्यात सर्रासपणे वाळू चोरली जात होती. यासाठी महसूल प्रशासनाने पथक नेमून अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर थेट कारवाई करण्यात आली. ज्यांनी दंड भरला नाही त्यांच्या महाराष्ट्र शासन महसूल नियमानुसार जमिनीवर बोजे लावण्यात येतील आणि अशीच कारवाई सतत सुरू राहणार आहे. पोलिस पाटलांनी वाळू वाहतूक करणार्‍यांना सहकार्य करू नये अन्यथा पोलिस पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबाले यांनी दिला आहे.