यावल शहरातील जलवाहिनीची गळती रोखण्याचे आव्हान

0

यावल । पालिकेला मिळणार्‍या एकुण पाणीसाठ्यापैकी तब्बल 40 टक्के पाणी वाया जाते, असा अहवाल वॉटर ऑडीटमधून समोर आला आहे. ही गळती रोखण्यासाठी पालिका उपाययोजना करत असून तात्पुरत्या स्वरूपात साठवण तलाव उभारून जुन्या तलावातील गाळ उपसा, गळती दुरुस्ती, प्लास्टिक कोटींग करण्यात येईल. उन्हाळ्यापूर्वी कोणत्याही स्थितीत 70 लाख रुपये खर्चाचे हे काम पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

माजी आमदारांनी केली होते सहकार्य
शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून सन 2000 मध्ये तत्कालीन आमदार रमेश चौधरी यांनी जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून भालशिव रस्त्यावर हतनूर कालव्यालगत साडेसहा कोटी रूपये खर्चाचा आणि 342 दशलक्ष लीटर क्षमतेचा साठवण तलाव उभारण्यास सहकार्य केले होते.

तलावाची साठवण क्षमता गाळामुळे निम्म्यावर
हा तलाव भरण्यासाठी हतनूरमधून आर्वतन घेतले जाते. मात्र, 17 वर्षांपूर्वी निर्मितीवेळी असलेली तलावाची साठवण क्षमता आता गाळामुळे निम्म्यावर आली आहे. कारण पूर्वी तलावात शहराला 90 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा व्हायचा. आता मात्र तलावातील पाणी केवळ 45 दिवस पुरते. त्यातही आर्वतनापैकी 40 टक्के पाणी वेगवेगळ्या गळत्यांमुळे वाया जाते.

जलयुक्तमधून मिळणार मदत
वॉटर ऑडीटमधून हा प्रकार समोर आला होता. यामुळे उन्हाळ्यापूर्वी पालिकेने तलावातून गाळ उपसा आणि दुरुस्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी तलावाला लागून असलेल्या जागेवर पर्यायी साठवण तलाव तयार करण्यात येईल. सोबतच जुन्या तलावातून गाळ उपसा होईल. यामुळे त्याची साठवण क्षमता वाढून शहराचा पाणीप्रश्न मिटेल. यासाठी यावल शहराला जलयुक्त शिवार योजनेतून मदत
मिळू शकते.

30 टक्के पाणी बचत
गळती थांबल्याने 30 टक्के वाहून जाणार्‍या पाण्याची बचत होऊन गाळ काढल्याने 45 ऐवजी 90 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा होईल वर्षभरात ऐवजी केवळ सहा वेळा आवर्तन घ्यावे लागेल शहरातील पाण्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी शासनाची मदत मिळावी यासाठी राज्यमंत्री गुलाबराव पाटलांसह आमदार हरिभाऊ जावळे, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची मदत घेतली जाणार आहे. तलावाला लागून असलेल्या जागेवरच तात्पुरत्या स्वरूपात कशा प्रकारे तलाव उभारता येईल? यासाठी फेब्रुवारीला सुजल निर्माण अभियानची टीम पालिका प्रशासन जागेची पाहणी करून आराखडा तयार करणार आहे.