सार्वजनिक बांधकाम विभागाने उचलले पाऊल ः 25 जुलै पासून मोहिम
यावल- शहरातून जाणार्या बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणामुळे होणारे अपघात तसेच होणार्या वाहतूक कोंडीनंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत अतिक्रमण न हटवल्यास रस्ता रोकोचा इशारा दिला होता. काँग्रेसच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावल्या असून 25 जुलैपर्यंत स्वतःहून अतिक्रमण न हटवल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बांधकाम विभागाच्या नोटीसीनंतर अतिक्रमण धारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे शहरातील अतिक्रमणाबाबत पालिका प्रशासनाने एकूणच केलेली चालढकल नागरीकांच्या संतापात अधिक भर घालत आहे.
अतिक्रमणामुळे कायदा-सुव्यवस्थेला आली बाधा
शहर व महामार्गावर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक समस्येसह कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत आहे. बेशिस्त वाहन पार्किंगमुळे होणारा त्रास व त्यातून होणारे वाद हे विषय नित्याचे ठरू पाहत आहे. त्यातच यावल बसस्थानक परीसरात रस्त्याच्या दुतर्फा वाढत असलेले अतिक्रमण व बरोबर बेशिस्त पार्किंगमुळे वाहन चालकांसह पादचार्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. शहरातून बाहेरगावी जाण्यासाठी खाजगी प्रवासी वाहनांना थांबा निश्चित केलेला असतानादेखील काही खाजगी प्रवासी वाहनधारक हे आपल्या सोयीनुसार त्यांचे वाहन रस्त्यात उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. अप्रिय घटनांना आळा बसण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने उशिरा का असेना घेतलेल्या स्तुत्य भूमिकेचे कौतुक होत आहे. असे असलेतरी प्रत्यक्षात अतिक्रमण निघणे गरजेचे आहे अन्यथा तु मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो, असे व्हायला नको, अशी भावना शहरवासीयांची आहे.
काँग्रेसने दिला होता आंदोलनाचा इशारा
अतिक्रमण काढण्यासंदर्भात यावल शहर काँग्रेसने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. यावल शहर काँग्रेस अध्यक्ष कदीर खान, अनिल जंजाळ, जावेद शहा, शेख निसार शेख ईसाक आदींनी सार्वजनिक बांधकाम, पोलीस स्टेशन, तहसील प्रशासनाला या संदर्भात निवेदनही देण्यात आले होते.
पोलिसांनी टोचले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कान
यावल शहरातून जाणार्या बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील चोपडा नाक्यापासून ते फैजपूर रोडवरील कला वाणिज्य महाविद्यालय पर्यंतच दुतर्फा अतिक्रमण काढण्यासंदर्भात 10 जुलै रोजी पोलीस प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आले होते तर या पत्राची खल घेत 12 रोजी संबंधित विभागाने उत्तर देत 25 जुलैपर्यंत अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावल्याचे सांगत कारवाई करण्याबाबत कळवण्यात आले तर दुसरीकडे पालिका प्रशासनाला पोलिस प्रशासनाने अतिक्रमण हटवण्यासंदर्भात पत्र दिल्यानंतरही पालिका प्रशासनाने चुप्पी साधली असून कुठलेही उत्तर देण्यात आले नसल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी सांगितले.