मिरवणुकीवर लोकप्रतिनिधींनी केली पुष्पवृष्टी ; हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना दिल्या शुभेच्छा
यावल- शहरात बुधवारी ईद-ए-मिलादून्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील बाबुजीपुरा भागातून मुख्य जुलूस (मिरवणुक) नातेपाक पठण करीत काढण्यात आली. ठिकठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले. जुलूसमधील सहभागी मुस्लिम बांधवांना हिंदु बांधवांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. मिरवणुकीत माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परीषद काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांच्यासह मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव सहभागी झाले. माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परीद सदस्य प्रभाकर सोनवणे यांच्याकडून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
हिंदू बांधवांनी दिल्या शुभेच्छा
उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, हाजी शब्बीर खान, नगरसेवक शेख असलम, मनोहर सोनवणे, हबीब मंजर, कदीर खान, शेख अलताफ, असलम मोमीन, अनिल जंजाळेसह शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, मान्यवरांनी सहभागी होत मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. ईस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद (सल्लल्लाहो अलैही वसल्लम) पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. या निमित्ताने शहरासह विस्तारीत भागात मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये रोशनाई व पताका लावून सजवण्यात आल्या होत्या. बुधवारी सकाळी शहरातील बाबुजीपुरा मार्गे, सुदर्शन चौक, डांगपूरा, मन्यारवाडा, मेनरोडने नातेपाकसह शांततेत जुलूस काढण्यात आला. दुपारी एक वाजेनंतर खिर्णीपुरा येथे या जुलूसचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत आबालवृध्दांसह बालक, तरूण मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाली.