आयोजकांतर्फे तयारी पूर्ण ; बारागाड्याही ओढल्या जाणार
यावल- सालाबादाप्रमाणे शहरात श्री बालाजी रथोत्सवाचे चैत्र पौर्णिमेला अर्थात शुक्रवार, 19 रोजी आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे यंदाचे 105 वे वर्ष आहे. शहरातील पालिकेच्या मुख्य इमारतीजवळ सुरक्षित ठेवलेल्या भगवान बालाजी यांच्या रथाची स्वच्छता व रथाच्या मार्गावरील अडथळे दूर करण्यात आले आहेत. याच दिवशी हनुमान जयंती व रथोत्सव असल्याने शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी महर्षी व्यास मंदिरापासून हडकाई-खडकाई नदीपात्रातून रथाची मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी सात वाजता डांगपुरी मशिदीजवळील नदीपात्रात येणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
नदीपात्रात होणार विधीवत पूजन
हडकाई-खडकाई नदी पात्रात रथाचे विधीवत पूजन केले जाणार आहे. सायंकाळी खंडोबाच्या बारागाड्या ओढल्या जाणार आहेत तर पुढे श्री बालाजी रथ शहरातुन रात्रभर फिरून दुसर्या दिवशी सकाळी रेणुका माता मंदिराजवळ आल्यानंतर श्री बालाजी रथोत्सवाचा समारोप होणार आहे. हा रथ उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल होणार आहेत. दरम्यान, शहरात हनुमांन जयंतीनिमित्त मोठा मारूती मंदिर., लक्ष्मी नारायण मंदिरा (वाणी गल्ली) जवळील हनुमान मंदिर, चावडी जवळील हनुमान मंदिर तसेच शहरातील हनुमान मंदीरामध्ये विविध पुजा व महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या रथोत्सवात कुठेही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या मार्गदशर्नाखाली पोलिस व होमगार्ड यांचा बंदोबस्त चोख राखण्यात आला आहे.