यावल शहरात खड्डेमुक्तीसाठी मनसेने घातले श्राद्ध

यावलमधील आंदोलनाची सर्वत्र चर्चा : सा.बां.विभागाच्या कारभाराविषयी संताप

यावल : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंकलेश्‍वर बर्‍हाणपूर राज्यमार्गाच्या दुरुस्तीबाबत वारंवार निवेदने देवूनही उपयोग होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी चक्क खड्डेमुक्तीसाठी श्राद्ध घातल्याने यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली. मनसेच्या आंदोलनानंतर तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येण्याची अपेक्षा सुज्ञ नागरीकातून व्यक्त होत आहे.

तर तीव्र आंदोलनाचा इशारा
यावल शहरातून गेलेल्या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर खडकाई नदीच्यापुढे प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याबाबत वारंवार सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे निवेदन देवूनदेखील रस्ता दुरूस्त केला जात नसल्याने सोमवारी या रस्त्यावरील खड्ड्यात बसून मनसेने खड्ड्यांना मुक्ती मिळण्यासाठी श्राध्द घातले व खड्डे बुजवण्याची मागणी केली. असुन तकाळ खड्डे बुजवण्यात आले नाहीतर याहुन तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मनसेच्या आंदोलनाची सर्वदूर चर्चा
शहरातून चोपड्याकडे जातांना खडकाई नदीच्या पुढे राज्य मार्गावर प्रचंड खड्डे पडले असून या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने वाहन धारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही व लहा-मोठे अपघात येथे नित्याचे झाले आहेत. प्रसंगी या ठिकाणी मोठा अपघात होवून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. या रस्त्याची दुरूस्ती व्हावी या करीता मनसेकडून सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात निवेदन देण्यात आले होते मात्र रस्त्याची दुरूस्ती करण्यात न आल्याने सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खड्ड्यात बसुन खड्ड्याचे श्राध्द घालण्यात आले व आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात घोषणा दिल्या व काही काळ या राज्य मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजुने खोळंबली होती.आंदोलकांनी खड्ड्यात पुजा अर्चा करीत श्रांध्द घातल्यानंतर पोलिसांनी रस्ता मोकळा केला. तत्काळ रस्ता दुरूस्त न केल्यास याहून अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, तालुका उपाध्यक्ष शाम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, गौरव कोळी, आबीद कच्छी, विपूल येवले, प्रतीक येवले, राज शिर्के, गणेश माळी, कुणाल बारी, आकाश चोपडे, कमलेश शिर्के आदींची उपस्थिती होती. रस्ता सुरळीत करण्यासाठी यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.