यावल : येथील डॉ.श्रीकांत महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी हितेश गजरे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी म्हणुन मंगळवार 7 रोजी शहरातुन मुकमोर्चा काढण्यात आला आहे. डॉक्टर व केमिस्ट असोसिएशनसह व्यापारी आणि शहरातील विविध संघटनेचे पदाधिकार्यांचा यात समावेश होता. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मेनरोडवरील डॉ.श्रीकांत महाजन हे आपल्या धन्वंतरी क्लिनीकमध्ये असतांना त्यांच्यावर शहरातील बोरावल गेट जवळील रहिवासी हितेश गजरे याने हल्ला केला होता. तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि हितेश गजरे याला अटक करून जामीनावर सोडण्यात आले.
सदरील आरोपीपासुन डॉ.श्रीकांत महाजन व त्याच्या कुटुंबीयास धोका असुन आरोपीवर ‘महाराष्ट्र मेडीकेअर महाराष्ट्र मेडीकल सर्व्हिस पर्सन अॅड मेडीकल सर्व्हिस इन्स्ट्रक्शन प्रिव्हेन्शन ऑफ व्हायलन्स अॅड डॅमेज ऑर लॉस टू प्रॉपर्टी अॅक्ट’ नुसार दखलपात्र गुन्ह्याची कलमे लावण्यात आली नाही म्हणुन ही कलमे लावण्यात यावी म्हणुन मंगळवारी दुपारी डॉ.श्रीकांत महाजन यांच्या राहत्या घरापासून पोलिस ठाण्यापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला. मेन रोडवरून पोलिसा ठाण्यापर्यंत हा मोर्चा आणत येथे निवासी नायब तहसिलदार वैभव पवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश तांदळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डॉ.महाजन कुटुंबीयास सदरील आरोपीपासुन धोका आहे तेव्हा तरी पुर्वीच्या फिर्यादी पुरवणीतील जवाब घेत गुन्ह्यातील कलमे वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात यावल मेडीकल असोसिएशन, यावल केमिस्ट असोसिएशन, व्यापारी व सुज्ञ नागरिकांचा सहभाग होता.