यावल शहरात धाडसी घरफोडी : 47 हजारांचा ऐवज लंपास

यावल : शहरातील विस्तारीत भागात असलेल्या स्वामी समर्थ नगरात बंद असलेल्या घरात अज्ञात चोरट्यानी घरफोडी करीत 47 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कांतीलाल ठाणसिंग पाटील यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ते सेवा निवृत्त वाहक असून विस्तारीत भागातील स्वामी समर्थ नगरात राहतात. घराला कुलूप लावुन मंगळवारी सहकुटुंब निमगाव येथे कार्यक्रमास गेले असता चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील 21 हजारांचे सोन्याचे मणी, सुटकेसमधील 15 हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तीन हजार रुपये किंमतीचे दोन चांदीचे कडे, दोन हजार 400 रुपये किंमतीच्या चांदीच्या पायल व सहा हजार रुपये रोख मिळून एकूण 47 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक अजमलखान पठाण करीत आहेत.