यावल । शहरातील बहुतांश भागातील पथदिवे हे बंदावस्थेत आहेत. तर काही भागात भरदिवसा पथदिवे सुरुच असतात. असा विरोधाभास शहरात दिसून येत आहे. पालिका कर्मचार्यांच्या दुर्लक्षितपणामुळे मात्र, विजेचा अपव्यय होत असून पालिकेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याने नुकसान होत आहे. शहरातील डॉ. बोंडे यांच्या दवाखान्यामागील परिसर व सुदर्शन ट्रॉकीज जवळील भागात पथदिवे हे दिवसाही सुरुच असतात.
कर्मचार्यांना सक्त ताकीद देण्याची गरज
शहरातील पथदिव्यांचे विजबिल कमी होऊन आर्थिक बचत होण्यायाकरीता नगरपालिकेने काही दिवसापुर्वी शहरात एलईडी दिवे लावण्यात आले. पण शहरातील पथदिवे जर दिवसा देखील असेच चालु राहतील तर विज बिल कसे काय कमी येणार? शहरात एलईडी दिवे लावण्याचा काय फायदा ? नगरपालिका प्रशासनाने शहरातील पथदिवे ठरलेल्या वेळेवर बंद होतील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून कर्मचार्यांना तशी सक्त ताकीद देण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
अंधारामुळे नागरिकांची गैरसोय
शहरात काही भागात पथदिवे नादुरुस्त झाल्यामुळे रात्रीच्या वेळेस गरज असताना देखील पथदिवे बंद असतात. त्यामुळे काळोख निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होत असते. तसेच रात्री अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरीच्या घटना देखील घडू शकतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
पैशांची उधळपट्टी
विजेची बचत हि काळाची गरज असून त्यादृष्टीने शासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना विज बचतीसाठी एलईडी दिवे लावण्याचे आवाहन केले जात आहे. त्यानुसार यावल पालिकेने शहरात एलईडी दिवे लावले खरे मात्र पालिकेन पथदिव्यांचे नियोजनासंदर्भात ज्या कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. ते कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे दिवसाही पथदिवे सुरुच असतात. पर्यायाने गरज नसतानाही पथदिवे सुरु असल्याने विजेचा अपव्यय होत असून यामुळे पालिकेचे विज बिल कमी होण्याऐवजी वाढणारच आहे. त्यामुळे पालिकेच्या पैशांचीही उधळपट्टी होत आहे.