शिवसेनेकडे आरोग्य खाते असूनही समस्या सुटत नसल्याने पदाधिकार्यांवर आंदोलनाची वेळ
यावल- युती सरकारमधील शिवसेनेकडे आरोग्य खाते असून डॉ.दीपक सावंत हे मंत्री असलेतरी यावल ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी डॉक्टर मिळत नसल्याने शिवसेनेवर आंदोलनाची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. शुक्रवारी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी वैद्यकीय अधिकार्यांच्या रीकाम्या खुर्चीला हार टाकून शासन आणि पक्षाच्या मंत्र्याला घरचा आहेर दिला. यावल ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून वैद्यकीय अधिकार्यांचे पद रिक्त आहे. या रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी मिळावा यासाठी शिवसेनेने गेल्या महिनाभरापासून धडपड सुरू केली आहे. त्यांनी मध्यंतरी तहसीलदारांना निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला होता. शुक्रवारी शिवसेनेच्या शहर पदाधिकार्यांनी रूग्णालय गाठून वैद्यकीय अधिकार्यांच्या खुर्चीला हार टाकला.
जनहितासाठी आंदोलन – जगदीश कवडीवाले
आंदोलनादरम्यान शहरप्रमुख जगदिश कवडीवाले यांनी भ्रमणध्वनीद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक रुग्ण अधिकारी डॉ. विजय जयकर यांचेशी संपर्क साधला. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने येणार्या अडचणी मांडल्या. तातडीने कायमस्वरुपी डॉक्टरची नेमणूक करून प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली. कवडीवाले म्हणाले की, जनतेचा प्रश्न सुटावा, या तळमळीतून आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलनात शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, किरण बारी, मोहसीन खान, हुसेन तडवी, सागर बोरसे, शकील पटेल, पिंटू कुंभार, विजय कुंभार, शेख रईस शेख रशीद, शेख अजहर, शेख जुनेद व शिवसैनिक उपस्थित होते.