यावल : शहरात सरस्वती शाळेला लागून मध्यवस्तीत सैनिक जवानाच्या घराला शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास आग लागल्यानंतर सुमारे चार लाख 85 हजारांच्या रोकडसह आठ लाखांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे मुस्लिम समाजबांधव नमाज अदा करण्यास जात असतानाच देश रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानाच्या घराला लागलेली आग पाहून बांधवांनी आग विझवत माणुसकीचे दर्शन घडवले मात्र आगीचा विळखा वाढत गेल्याने संपूर्ण घर खाक झाले. आग लागली तेव्हा सैनिक जवानाचे आई-वडील बाहेर गावी गेले होते व घराला कूलूप असल्याने जीवीतहानी टळली असलीतरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली.
आगीचे नेमके कारण अस्पष्ट
शहरात सरस्वती विद्या मंदिराजवळ सैनिक जवान दिनेश मदन भोईटे हे आई-वडीलांसोबत राहतात. सैन्यातील जवान भोईटे हे जम्मू-काश्मिरमध्ये सीमेवर तैनात असून त्यांचे आई-वडील घराला कुलूप लावुन बुलढाणा येथे नातेवाईकांकडे गेले असतानाच शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घराला आग लागली. घराला कुलूप असल्याने आग विझवण्याकरीता शेजारील घराच्या छतावरून काही जणांनी आग विझवण्यास सुरवात केली व आगीचा विळखा संपूर्ण परीसरात पसरू नये म्हणून मोठ्या संख्येत नागरीक सरसावले.
आगीत आठ लाखांचे नुकसान
आग प्रकरणी मदन बळवंतराव भोईटे (यावल) यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या आगीत एकूण सात लाख 85 हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आगीत टीव्ही, फ्रीज, मिक्सर, कपाट, पिठाची गिरणीसह गादीच्या खोळमध्ये ठेवलेले चार लाख 58 हजारांची रोकड आगीत जळाल्याने एकूण सात लाख 85 हजारांचे नुकसान झाले. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नितीन चव्हाण करीत आहेत.