यावल- शहरातील सराफा व्यावसायीक श्रीनिवास महालकर यांच्यावर चार अज्ञात तरुणांनी चाकूच्या धाकावर आठ लाख 72 हजार रुपयांचे दागिने लुटल्याची घटना 13 एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी आकाश सपकाळे, चेतन कोळी व गौरव कुंवर या संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. आरोपींकडून सुरुवातीला चांदीचे दोन लाख 74 हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केल्यानंतर संशयीत आकाश सपकाळेने 119 ग्रॅमचे पाच लाख 98 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेला व भुसावळ रस्त्यालगत लपवलेला डबा पोलिसांना गुरुवारी काढून दिला तर या प्रकरणातील चौथा संशयित गोलू उर्फ यश राजेंद्र पाटील पसार आहे. दरम्यान, गुरुवारी संशयीत गौरव कुवर याची ओळखपरेड करण्यात आली तर या प्रकरणी अटकेतील तिघांना शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपास सहा.पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.
अंजाळे घाटातील लुटीचा संशय
अंजाळे घाटात 11 नोव्हेंबर 2017 रोजी सराफ व्यावसायीक रमेश सदाशिव जाधव (55) यांच्यावर सहा संशयितांनी हल्ला करीत 15 लाख रुपये किमतीचे दागिने लुटले होते. या प्रकरणातही याच संशयितांचा समावेश असावा, असा पोलिसांना संशय आहे.