यावल । तालुक्यातील यावल ते सौखेडा या रस्त्यात विरावली गावाजवळ प्रवेश करतांना मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही महिन्यांपुर्वीच पुलाचे काम झाले असून सुध्दा त्याच्या सभोवताली रस्त्याची खुपच दयनिय अवस्था झाली आहे. पूला झालेला असून सुध्दा गावातील गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. तरी या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी येणार्या जाणार्या गाडीचालकांना अपघाताचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
विरावली येथून दहिगाव, सौखेडा, कोरपावली, महेलखेडी, मोहराळा व हरिपुरा एवढ्या गावाचे नागरीक रोज ये-जा करत असतात. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. याठिकाणी पाण्यामुळे खड्ड्यांची खोली समजत नाही. त्यामुळे गाडीचालकास अंदाज घेता येत नाही. त्यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पुलाचे काम चालू असतांना नागरिकांना आशा होती की येथील खड्ड्याचे पाणी गड्ड्यात थांबणार नाही परंतु पुलाचे पाणी या खड्ड्यात येते. तरी हा पुल होवून गावातील समस्या सुटत नाही. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून गावातील रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी नागरिकांची मागणी आहे.