पुणे : आजवर मी प्रकाशात रहावं म्हणून माझ्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक लोकांचा आज सन्मान होत आहे, याचा मला आनंद आहे. देशभरातील लोकांनी माझ्या कामासाठी मला भरपूर प्रेम दिले. तुमचं हे प्रेम मला आधी कळले असते तर मी याहूनही अधिक उत्तम काम केले असते अशी भावना जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कलासंस्कृती परिवाराच्या वतीने दिला जाणारा ‘कलाकृतज्ञता पुरस्कार’ स्विकारताना व्यक्त केली.
कलासंस्कृती परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘स्टार ऑफ स्क्रीन’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारांचे यंदा चौथे वर्ष होते. विक्रम गोखले यांना ‘कलाकृतज्ञता पुरस्कार’, माजी आमदार व कला अभ्यासक उल्हासदादा पवार यांना ‘समाज संस्कृती पुरस्कार’, किशोर पंडित, बाळासाहेब शिंदे आणि शुभांगी दामले यांना ‘निकोप सेवा पुरस्कार’, प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेते अजिंक्य देव यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या प्रसंगी चित्रपटाच्या पडद्यामागील तंत्रज्ञ कलाकार यांना ‘स्टार ऑफ स्क्रीन’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी कलासंकृती परिवाराचे अध्यक्ष वैभव जोशी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कलासंस्कृती परिवाराचे उपाध्यक्ष माधव अभ्यंकर, मंगेश नगरे, सचिव विनय जवळगीकर, खजिनदार प्रवीण वानखेदे, रणजीतसिंह मोहिते पाटील, संजय ठुबे, राज काझी आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जॅकी श्रॉफ यांनी आपल्या खास शैलीत पुणेकरांशी संवाद साधला. कलासंस्कृती परिवाराच्या पडद्यामागील कलाकारांचा सन्मान करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मल्लखांब, योगासने, नृत्य, स्कीट आदी विविध सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच या प्रसंगी महाराष्ट्र मंडळाच्या मल्लखांबपटूनी प्रात्यक्षिके सादर केली, त्यांना विक्रम गोखले यांनी ११ हजार१११ रुपय्यांचे रोख पारितोषिक दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी पोफळे यांनी केले.