नवी दिल्ली-या आठवड्यात संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून काही ठिकाणी तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, तामिळनाडू, आसाम, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये काही अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर 17 दिवसांमध्ये पावसाने संपूर्ण भारत आता व्यापला असून येता आठवडा मुसळधार पावसाचा व काही भागांमध्ये अतिवृष्टीचा असेल असे हवामान खात्याने सोमवारी म्हटले आहे.
हिमालयाच्या लगत असलेल्या पश्चिम बंगाल, सिक्किम, बिहार, आसाम व मेघालयातील काही भागांमध्येही अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर मुसळधार पावसाची शक्यता गुरूवारी व्यक्त करण्यात आली आहे. कोकण व गोवा किनारपट्टीवर मंगळवारी जोरदार पाउस पडेल असा अंदाज असून गुरुवारी मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शुक्रवार हा देखील कोकण, गोवा व कर्नाटकच्या किनारी भागासाठी जोरदार पावसाचा असेल असा अंदाज आहे. यावर्षी केरळच्या किनारपट्टीवर पाऊस तीन दिवस आधीच म्हणजे 29 मे रोजी धडकला. त्यानंतर त्याचं महाराष्ट्रातही आगमन झाले. मात्र, कोकण किनारपट्टीवर काही दिवस वगळता पावसानं दडी मारली होती. आता मात्र महाराष्ट्रासह देशातल्या बहुतेक राज्यांमध्ये या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामध्ये महाराष्ट्रातील कुठल्याही भागाचा समावेश नाही.