“या” कारणासाठी झाली मोदींच्या उपस्थितीत भाजपा-आरएसएसची बैठक

उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपाने सुरू केली आहे. निवडणुकीची स्ट्रेटजी ठरवण्यासाठी रविवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा आणि आरएसएस नेत्यांची उपस्थिती होती. ‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, करोनाची दुसरी लाट हाताळण्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत आहे. विरोधकांकडूनच नाही, तर भाजपातील खासदार आणि नेत्यांकडून योगी सरकारवर टीका होत आहे. त्यातच अलिकडेच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपाची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे भाजपाने सरकारची प्रतिमा चांगली करण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्याचं काम सुरू केलं आहे.