‘या’ गावांमध्ये कोरोना चाचणी केल्यानंतरच मिळणार व्यवसायाची परवानगी

 

जामनेर – तालुक्यातील पहुर पेठ ,पहुर कसबे या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.याच बरोबर काही मृत्यूंची नोंद सुद्धा झाली आहे.याची दखल घेत गुरुवारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी पहुर येथे भेट दिली व वैद्यकीय पथकाने डॉ.जितेंद्र जाधव व डॉ. जितेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण केले व संशीयितांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. पेठ व कसबे दोन्ही ग्रामपंचायतीच्या व लोकप्रतिनिधी मदतीने सर्व व्यावसायिक दुकानदार, खाजगी डॉक्टर त्यांच्या दवाखान्यात काम करणारे व्यक्ती, खाजगी व सरकारी दवाखान्यात येणारे सर्व रुग्ण,भाजीपाला विक्रेते,सलून दुकानदार इ.ची कोरोना चाचणी ग्रामीण रुग्णालय पहुर येथे दुपारी बारा वाजता करण्यात आली. कोरोना चाचणी केल्यानंतरच त्यांना व्यवसायासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

पहुर येथील एक खाजगी डॉक्टरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ही रुग्ण तपासणी केल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांना मिळाली त्यानुसार त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.जर अशी घटना खरोखरच घडली असेल तर संबंधित डॉक्टरांचे नाव मा.जिल्हाधिकारी यांना कळवून त्यांच्या विरोधात साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असे डॉ.राजेश सोनवणे यांनी सांगितले.
तसेच नागरिकांनी मास्क ,वारंवार हात धुणे, गर्दी न करता एकमेकांपासून अंतर ठेवावे व किरकोळ आजाराची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून पुढील उपचार करावे म्हणजे रुग्णाचा घोका कमी होतो असे त्यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालय पहुर येथे लवकरच कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत मा. जिल्हाशल्य चिकित्सक यांना कळवण्यात येणार आहे व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उद्यापासून ६० वर्षे वरील व ४५ वर्षे वरील कोमॉरबीड नागरिकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेश सोनवणे यांनी माहिती दिली.