लखनऊ । आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती, मित्र किंवा परिचयातील व्यक्तीची जन्मतारीख एकच असल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र, भारतामध्ये असे एक गाव आहे ज्या ठिकाण सर्वांचीच जन्मतारीख 1 जानेवारी आहे. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे. उत्तर प्रदेशातील 10 हजार लोकसंख्या असलेल्या कंजसा या गावातील सर्वांचीच जन्मतारीख 1 जानेवारी आहे. गावातील नागरिकांचं आधारकार्ड सांगत आहे. अलाहाबादमधील गुरपूर ब्लॉक येथील कजंसा गावात हा प्रकार उघडकीस आला आहे.
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील कंजसा गावातील प्रत्येकाची जन्मतारीख 1 जानेवारीच आहे. त्यांच्या आधारकार्डावरील जन्मतारीख 1 जानेवारी आहे. उत्तर प्रदेश सरकारने शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या माहिती करून घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक नोंद करण्याचा आदेश दिला आहे. 10 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात कोणत्याही घरात गेले असता प्रत्येकाची जन्मतारीख एकच म्हणजे 1 जानेवारी असल्याचे दिसून आलं. शाळेतील मुलांच्याच नव्हे तर गावातील प्रत्येकाच्याच आधार कार्डवर एकच जन्मतारखेची नोंद होती. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांनी ही चूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता ही चूक सुधारली जाईल, असे म्हटले जात आहे. आधार कार्डवर चुकीची जन्मतारीख नोंद झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर गावकर्यांना पुन्हा नव्याने आधारकार्ड दिले जाणार आहे. अनेक कामांसाठी आधारकार्ड लागते. आता या चुकीमुळे आमची कामे कशी होणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.