रविवार, दुपारचे 12 वाजलेत, डोक्यावर रणरणतं ऊन, त्या उन्हात ढोल-ताशा एक आपला वेगळा ताल निर्माण करतोय. एका सजवलेल्या ट्रकवर कार्यकर्ते गाणी म्हणताहेत, संविधानाची प्रतिकृती असलेला चित्ररथ उभा आहे. त्याच्या मागे संविधान सभेचा देखावा असलेला राष्ट्र सेवा दलाचा चित्ररथ उभा आहे. महादेव पाटील, रेखा नकती, लवू बांडे, अवघडी घोडके, शाम पाटेकर ही सेवादलाची मंडळी कार्यकर्त्यांना बॅचेस लावण्याचे काम करताहेत. या फ्लोटच्या मागे डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या प्रतिकृती असलेला चित्ररथ अनेकांचे लक्ष वेधून घेतोय. या ट्रकच्या मागे आणखी एक फ्लोट आहे त्यावर समतेची गाणी म्हणणारे तरुण मुलामुलींचा वाद्यवृंद आहे. बेभान होऊन ती गाताहेत.
दुपारचा एक वाजला आहे. ऊनही चढू लागले आहे.कार्यकर्त्यांची लगबग आणि गर्दीही वाढू लागली आहे. माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. जी. जी. पारीख, कॉम्रेड भालचंद्र कांगो, उल्का महाजन, सुरेखा दळवी, आमदार विद्या चव्हाण, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, युवराज मोहिते, व्हीजेटीआयचे प्रा. प्रवीण देशमुख, कमलाकर सुभेदार, घर बचाव आंदोलनाचे बिलाल खान, अविनाश कदम, शिवराम सुखी आदी मंडळी जमू लागली. संविधान संवर्धन समितीचे सुरेश सावंत, महेंद्र रोकडे, सेवा दलाचे उमेश कदम, हिरामण खंडागळे, वैशाली जगताप, युवा क्रांती सभेचे विशाल हिवाळे, अंनिसचे नंदकिशोर तळाशीलकर राइट टू पीच्या मुमताज शेख, जगन्नाथ कांबळे, राजू रोटे, गोरख आव्हाड, विनोद पवार, शरद लोखंडे, अजित बनसोडे आपल्या सहकार्यांसह प्रत्येकाचे स्वागत आणि विचारपूस करत होते. हातात तिरंगा घेतलेली तरुण मुले, पुढे बाइकस्वार, वातावरणात एक प्रकारचा उत्साह भरलेला दिसतोय. 1 वाजून 15 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान जागर यात्रा चैत्यभूमीकडे निघाली. रयतेचा राजा शिवछत्रपतीकडून महामानव बाबासाहेबांपर्यंत संविधानिक मूल्यांचा जयघोष करीत यात्रेचा प्रवास सुरू झाला. पी. एल. लोखंडे मार्ग, वाशीनाका येथून आलेल्या कार्यकर्त्यांनी चेंबूर नाक्यावर यात्रेचे स्वागत केले. ढोल-ताशा, गाणी, घोषणांनी वातावरण ढवळून गेले होते. दुपारचे तीन वाजलेत यात्रा सुमननगर येथे पोहोचली. दुपारचे 4 वाजलेत यात्रा आता सायन सर्कल येथे पोहोचली. शेकापचे राजू कोरडे आणि त्यांच्या सहकार्यांनी यात्रेचे स्वागत केले. पुलावरून पुष्पवृष्टी केली जात होती. पुढे जनता दलाचे कार्यकर्ते प्रभाकर नारकर यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचे स्वागत करत होते. अपना बाजारचे अनिल गंगर, अपना बँकेचे अविनाश सरफरे, प्रा पुष्पा भावे, माजी खासदार मेजर सुधीर सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, आनंदराज आंबेडकर, प्रसिद्ध सिनेअभिनेते किशोर कदम, कवियत्री नीरजा, ज. वि. पवार, सुहास बने आदी मंडळी यात्रेत झाली. टिळक ब्रीजवर यात्रा पोहोचली. व्यासपीठावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश आंबेडकर, आमदार विद्या चव्हाण, कन्हैया कुमार उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश सावंत यांनी केले. एक महिन्यापूर्वी दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात गणेश देवी, कुमार केतकर यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या संविधान जागर यात्रेच्या उदघाटन सभेपासून मुंबईतील वस्ती पातळीवर सामान्य लोकांनी केलेला प्रचार आणि प्रसार आणि त्यातून जमलेली ही आजची संविधानप्रेमी नागरिकांची अलोट गर्दी याचा त्यांनी प्रास्ताविकात आढावा घेतला. 35 हून अधिक संघटना संस्थांचा सहभाग असलेली ही यात्रा संयोजकांना आणि कार्यकर्त्यांना नवा विश्वास देऊन गेली. समाजामध्ये जी अस्वस्थता आहे तिचे प्रतिबिंब या यात्रेत दिसून येत होते. ही संविधान यात्रा निव्वळ संविधानिक मूल्यांची आठवण करून देण्यासाठी नव्हे, तर सत्ताधार्यांना इशारा देण्यासाठी व त्यांच्या फॅसिष्ट डावांना खपवून घेतले जाणार नाही हे जाहीरपणे सांगण्यासाठी होती. जागोजागी जमलेले सामान्य नागरिक, विविध क्षेत्रांतील अगदी साम्यवादी, समाजवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी तरुण मुले, महिला एकत्रितपणे रस्त्यावर उतरले व जाब विचारत निघाले ही लोकशाही मजबूत करणारी प्रक्रिया व संविधानातील तत्त्वांना अभिप्रेत असणारी घटना आहे. या शक्तींना डावलून आता कुणालाच पुढे जाता येणार नाही.
-शरद कदम
अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, मुंबई