सध्या राज्याच्या वर्तुळात शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून रणकंदन सुरू आहे. कर्जमाफीवरून नेहमीचेच दळण सुरू आहे. मुळात सध्याचे सत्ताधारी किंवा विरोधक यांना हा प्रश्न माहिती नाही, असे थोडेच आहे? हा प्रश्न काय आहे, त्याच्यावरची उत्तरे काय आहेत, याची माहिती या दोन्ही घटकांना आहे, तरीही सभागृहात आणि बाहेर रणकंदन माजवले जात आहे. यातून काय निष्पन्न होणार आहे?
एकीकडे हे रणकंदन सुरू असतानाच तिकडे नगर जिल्ह्यातील पुणतांबा व पंचक्रोशीतील शेतकर्यांनी संपाची हाक दिली आहे. त्याकडे सरकार, विरोधक आणि समाज या घटकांचे म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही. सरकार व विरोधकांचीच असंवेदनशीलता यातून पुढे येते आहे. संप ही संघटित क्षेत्राची बाब मानली जाते. त्यातही कामगार वर्गाची मक्तेदारी म्हणूनच संपाकडे पाहिले जाते. शेतकरी हा घटक संप करू शकतो, अशी कल्पनाही कधी कोणी केली नव्हती. अगदी कठोर अर्थवास्तव आणि शोषणाचा सिद्धांत मांडणार्या कार्ल मार्क्सनेही ती केली नव्हती. गेल्या काही वर्षांत वरुणराजा नेमाने संपावर जातो आहे. त्यामुळे आपण दुष्काळाचा सामना करतो आहे. हा वरुणराजा आता सारखा संपाचे हत्यारका उपसतो आहे, त्याचा हा संप बंद व्हावा म्हणून काय करावे लागेल किंवा अधूनमधून त्याच्या बरसणार्या पाण्याचे कसे नियोजन करायचे हे सर्व, सरकार आणि समाज म्हणून आपल्याला ठाऊक आहे. पण आपण करत काहीच नाही, ही शोकांतिका आहे. या सर्वांत राज्यातला बळीराजा मात्र नित्यनेमाने काळ्या आईची त्याला जमेल तशी सेवा करतो आहे. आता त्यालाही संपावर जावे, असे वाटू लागणे ही गंभीर बाब आहे. आता तरी आपण जागे व्हायलाच हवे.
मुळात शेतीच्या प्रश्नाकडे मानवीय दृष्टिकोनातून पाहायला हवे. अन्य वाहने खरेदीसाठी 9-10 टक्के व्याज आणि ट्रॅक्टरसाठी 15 टक्क्यांहून अधिक व्याज? सरकार, वित्तीय संस्थांचा प्राधान्यक्रम कशाला आहे, हे यावरून लक्षात येईल. शेतीला उद्योगाचा दर्जा नाही. शेतीत गुंतवणूक नाही. काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा वापर नाही. शेतमालावर प्रकियेचे प्रमाण अत्यल्प. नित्यनेमाने येणार्या संकटांवर मात करून पीक घेतले, तरी आपणच घेतलेल्या उत्पादनाचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकर्यांना नाही. बळीराजाकडे आर्थिक तरलता नाही. हंगामात केलेल्या गुंतवणुकीच्या परताव्याची हमीच नसल्याने नफ्याचा प्रश्नच येत नाही. परिणामी, शेती करणे परवडत नाही. ही काही फक्त महाराष्ट्रातील स्थिती नाही. कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा आदी राज्यांतील शेतकरी आत्महत्येच्या रूपाने काळोखाची वाट जवळ करत आहेत. आत्महत्या हा कोणत्याही प्रश्नावरचा किंवा दुःखावरचा उपाय नाही, हे त्रिवार सत्य. पण नैराश्य आलेल्या जीवांच्या सांत्वनाची किंवा त्या जीवांना सावरण्याची व्यवस्था तरी कुठे आहे? त्यामुळे काळोखाकडून काळोखाकडे प्रवास सुरूच आहे.
हतबल झालेल्या शेतकर्यांना धीर देण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांचे राजकारण केले जात असल्याची भावना का दृढ होते आहे, याचा विचार तरी सरकार आणि विरोधकांनी करायला हवा. उपद्रवमूल्य असल्याखेरीज अलीकडे राज्यकर्ते आणि राजकारणी कशाची दखलच घेत नाहीत. शेतकर्यांचे उपद्रवमूल्य काय? अभिनेता मकरंद अनासपुरेने परवा पुण्यात, शेतकर्यांचा फुटबॉल करू नका, अशी भावना व्यक्त केली. त्यातच शेतकर्यांचे उपद्रवमूल्य शून्य असल्याचे स्पष्ट होईल. उपद्रमूल्य नसलेल्यांचाच फुटबॉल होतो. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकर्यांना संपाचे आवाहन केले होते. पुणतांब्यातील शेतकर्यांनी आता संपाची हाक देत हे पाऊल उचलले आहे. शेतकर्यांच्या संघटना म्हणवून घेणार्यांना हे का सूचले नाही, असा प्रश्न विचारणे फिजूलच ठरणार आहे.
आतापर्यंतच्या सरकारांनी असंख्य प्रश्न आणि विविध क्षेत्रांसाठी अभ्यासगट नेमले होते. त्या अभ्यासगटांच्या शिफारशी, सूचना आल्या की त्यावर सोयीनुसार निर्णय घेतले गेले. अनेक अहवाल आजही धूळ खात पडले आहेत, तर अनेक शिफारशींना अंमलबजावणीचे भाग्य वाट्याला आले. देशातील ऋषितुल्य कृषितज्ज्ञ स्वामिनाथन यांनी शेतकर्यांची स्थिती सुधारण्यासाठीचा अहवाल मागच्या केंद्र सरकारला सादर केला होता. या संपाच्या इशार्याने ती घेतली जाईल काय? पुणतांबे गावाला वेगळी ओळख आहे. चांगदेव महाराजांचे हे गाव. ते वाघावर बसून हाती साप घेऊन संत ज्ञानेश्वरांच्या भेटीला गेल्याचे सांगितले जाते. याच पुणतांब्यातील शेतकर्यांनी आता व्यवस्थेविरोधात आसूड उगारला असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. शेतकर्यांनी वर्षभर पीकच घेऊ नये, केवळ कुटुंबापुरते पिकवायचे, इतरांसाठी नाही, असा सल्ला शरद जोशींनी दिला होता. त्यांचा तो सल्ला त्या वेळी आततायीपणाचा वाटला होता. पण आताही शेतकर्यांपुढे पर्याय काय? पिकवलेच नाही, तर अन्य घटक खातील काय? सरकार तरी किती आणि काय काय आयात करणार? शरद जोशींच्या निधनानंतर का होईना तरुण शेतकरी संघटित होऊन आता शेतीच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी संपाची भाषा करीत आहेत. पिकापिकांत, गटातटांत विभागलेला शेतकरी आता कोणत्याही नेतृत्वाशिवाय संघटित होऊ लागला आहे, हेच पुणतांब्याच्या घटनेचे सार आहे. आमच्या नेत्यांना याचे तरी भान आहे काय? पुणतांब्याचे हे आंदोलन देशातील शेतकर्यांंना धडा घालून देणारे आहे. कवी इंद्रजित भालेराव यांची ‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक!’ ही कविता म्हणूनच मनात रुंजी घालते आहे.
गोपाळ जोशी – 9922421535