वॉशिंग्टन । भारताचा आघाडीचा टेनिसपटू युकी भांबरीने वॉशिंग्टंनमध्ये सुरू असलेल्या सीटी ओपन टेनिस स्पर्धेतील आगेकूच कायम राखली आहे. दुसर्या फेरीत फ्रान्सच्या गेल मॉनफ्लिसला हरवणार्या युकीने तिसर्या फेरीत अर्जेंटिनाच्या गुइडो पेलाचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. जागतिक क्रमवारीत 200 व्या स्थानवर असलेल्या पेलाचे आव्हान 6-7, 6-3, 6-1 असे परतवून लावले. उपांत्यपूर्व फेरीत युकीसमोर क्रमवारीत 45 व्या क्रमांकावर असलेल्या द.आफ्रिकेच्या केविन अँडरसनचे आव्हान असेल.ज्युनिअर गटातील अव्वल स्थानावर राहिलेल्या युकीची कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
स्पर्धेत थेट प्रवेश
मॉनफ्लिस आणि पेलावर मिळवलेल्या विजयांमुळे युकीला आता एटीपी टेनिस स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. युकीने अँडरसनवर विजय मिळवल्यास त्याच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल. अँडरसनने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवताना अव्वल मानांकन मिळालेल्या डॉमिनिक थिएमला पराभवाचा धक्का दिला. पंधरावे मानांकन मिळालेल्या अँडरसनने हा सामना 6-3, 6-7,7-6 असा जिंकला.