युकी भांबरी, साकेतचे पुनरागमन

0

नवी दिल्ली । भारताचे आघाडीचे टेनिसपटू युकी भांबरी आणि साकेत मायनेनी यांनी डेव्हीस कपमधील जागतिक गटातील कॅनडाविरुद्धच्या प्ले ऑफ लढतीसाठी राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. भांबरी आणि मायनेनी दुखापतींमुळे उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकले नव्हते. या दोघांशिवाय रामकुमार रामनाथन आणि दुहेरीतील स्पेशलिस्ट असलेल्या रोहन बोपण्णाचा पुढील महिन्यात होणार्‍या या लढतीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा जेष्ठ खेळाडू लिएंडर पेसला वगळण्यात आले असून राखीव खेळाडू म्हणून प्रज्नेश गुन्नेस्वरन आणि एन. श्रीराम बालाजी यांची निवड करण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यात उझबेकिस्तानमध्ये झालेल्या लढतीसाठी पेसचा संघात समावेश करण्यात आला होता. पण, कर्णधार महेश भुपतीने त्याला अंतिम चौघांमधून वगळले होते. अशापद्धतीने मानहानी झाल्यामुळे पेसने ती लढत अर्धवट सोडली होती. डेव्हीस कपमधील दुहेरीतील सर्वाधिक विजयांचा विश्‍वविक्रम करण्यासाठी पेसला आणखी एका विजयाची आवश्यकता आहे. इटलीचे दिग्गज टेनिसपटू निकोला पिएत्रगेली यांच्या 42 विजयांची पेसने बरोबरी केली आहे. भारत आणि कॅनडा यांच्यात याआधी डेव्हिसकप लढतीचा सामना झालेला नाही. भारताने याआधी न्यूझीलंड आणि उझबेकिस्तानविरुद्ध 4-1 असे विजय मिळवत डेव्हिस कप लढतीच्या एलिट गटात खेळण्याच्यादृष्टीने आगेकूच केली आहे.