पाचोरा : रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केल्यानंतर भारतातून वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी भारताची वाट धरली आहे. पाचोरा शहरातील विद्यार्थी सुरज शिंदे हा देखील वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन गेल्यानंतर तो सुखरूप पाचोरा शहरात परतताच त्याचे काँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी स्वागत केले.
शून्य तापमानात गाठले पायीच विमानतळ
पाचोरा तालुक्यातील मोढांळा येथील सेवानिवृत्त सैनिक रविंद्र शिंदे यांचा मुलगा सुरज शिंदे हा एमबीबीएसच्या दुसर्या वर्षाला युक्रेन येथे शिक्षण घेत आहे. सद्य परीस्थितीत युक्रेन व रशियात युध्दाला सुरवात झाल्यानंतर हजारो विद्यार्थी अडकून पडले आहेत. युक्रेन येथून परतणार्या सहाव्या विमानातून सुरज शिंदे हा सुखरूप मायदेशी परतला आहे. आठ किलोमीटर अंतर शुन्य तापमानात पायी चालत त्याने विमानतळ गाठले. दरम्यान,
मुंबई विमानतळावरून रेल्वेने गावी आल्यावर पाचोरा रेल्वे स्थानकावर काँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सुरजचे स्वागत केले. यावेळी शिवदास पाटील, बाळु पाटील, राहुल शिंदे, रवी सुरवाडे, सतीश वाकडे आदींसह सुरजचे वडील रवींद्र शिंदे व त्याच्या आई उपस्थित होत्या.