युग तंत्रज्ञानाचे; उमेदवारी अर्ज भरण्यास आधार मात्र ‘पंचांगा’चा

0

भुसावळ । भुसावळ विभागात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असलातरी पितृपक्षात शुभ कार्य अशुभ असल्याची अंधश्रद्धा असल्याने उमेदवारी दाखल करण्यासाठी उमेदवार फारसे इच्छूक नसल्याचे चित्र आहे. 8 पासून सुरू झालेल्या पितृपक्षाचा समारोप मंगळवारी सर्पपित्री अमावस्येला झाल्याने उमेदवारांना हायसे झाले असून बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वेग येणार असल्याचे चित्र आहे.

रावेर तालुक्यात तीन अर्ज दाखल
भुसावळ विभागातील भुसावळ तालुक्यातील सहा, यावल तालुक्यातील आठ तर रावेर तालुक्यातील 22 व बोदवड तालुक्यातही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असलीतरी पितृपक्षामुळे उमेदवारांनी अंधश्रद्धेवर विश्‍वास ठेवत ‘पित्तरपाट्यात शुभ कामे नकोत’ म्हणत अर्ज दाखल करण्यास अनुत्सुक दिसले. मात्र रावेर तालुक्यातून तीन तर यावल तालुक्यातून एक अर्ज दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यावल तालुक्यात सरपंच पदासाठी एकच अर्ज
यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सरपंचसह 86 जागेपैकी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी केवळ एकच अर्ज दाखल झाला आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याकरीता आता केवळ तीनच दिवस राहिले आहेत. तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या 29 प्रभागातुन 78 सदस्य तर जनतेतून थेट 8 सरपंचांची निवडी करीता 15 ते 22 सप्टेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन दाखल करायची आहेत. त्यात मंगळवारी पाचव्या दिवशी चिखली बुद्रुक येथे सरपंचपदाकरीता कासाबाई कौतीक कोळी या महिलेने अनुसुचित जमातीच्या जागेवर अर्ज दाखल केला आहे. शेवटच्या तीन दिवसात शासनाचे संकेतस्थळ, वीजपुरवठा या संदर्भात अडचणी वगळता इच्छूक उमेदवारांना अर्ज दाखल करण्याकरीता पुरेसा वेळ मिळेल का ? हे देखील पाहणे महत्वाचे आहे.

राजकीय आखाडा तापणार
भुसावळ तालुक्यात असलेल्या सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये पिंपळगाव खुर्द व बु.॥, कन्हाळे खुर्द, ओझरखेडा, मोंढाळा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 15 ते 22 सप्टेंबर पर्यंत मुदत असून 25 रोजी छाननी, 27 रोजी माघार व याच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्याषत येईल. 7 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 9 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.