युतीची चिंता सोडा निवडणूक युद्धाची तयारी करा-मुख्यमंत्री

0

नागपूर- येत्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होणार की नाही, याची चिंता करू नका, यासंदर्भातील निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्यावर सोडून द्या, निवडणूक युद्धाची तयारी ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.

भाजपच्या पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, प्रवीण पोटे, खासदार संजय धोत्रे, रामदास तडस, पश्चिम विदर्भातील भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते.

शिवसेनेसोबत युती झाली नाही, तरी आपण काय करू शकतो, हे आपण दाखवून दिले आहे. पण, आता केवळ निवडणुकीपुरता विचार न करता गावागावांत भाजपची ताकद वाढवण्याची गरज आहे. हिंदुत्ववादी विचारांच्या विविध पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहेच, पण युद्धाची तयारी नेहमी ठेवली पाहिजे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षाचा मालक हा कार्यकर्ता आहे. तो अतिसंवेदनशील आहे. पण सतत विरोधी पक्षात राहण्याच्या सवयीमुळे नकारात्मक भाव निर्माण झाला आहे.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संघटनेच्या कामात स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन केले.