युतीची वाट पाहण्याआधीच शिवसेनेचा जाहीरनामा जाहीर

0

मुंबई । शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात युतीबाबत चर्चा होत असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचा मुहूर्त साधत शिवसेनेने सोमवारी आपल्या जाहीरनाम्याची घोषणा केली. युती झालीच तर भाजपाच्या काही विषयांचा यात समावेश करू, असेही शिवसेनेने नमुद केले आहे हे विशेष. अर्थात यातून युतीची शक्यता असल्याचेही दर्शविण्यात आले आहे.

काय आहे सेनेच्या वचननाम्यात?
शिवसेनेच्या वचननाम्यात अनेक लोकप्रिय घोषणांचे समावेश आहे. यात 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट, ई-वाचनालय, आत्मरक्षण प्रशिक्षण केंद्र, महापालिकेच्या विद्यार्थ्यांना महापालिकेत नोकरीस प्राधान्य, महापालिकेची संगीत अकादमी, उद्यानांची नव्याने उभारणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, बहुरूग्णवाहिका, आरोग्य सेवा आपल्या दारी, वृद्ध रूग्णांना घरी जाऊन उपचार देणार, सार्वजनिक स्वच्छतागृहात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन, मुंबईकरांसाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना, पूर्व उपनगरात गोवंडी येथील शताब्दी रूग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय, जेनेरीक मेडिसिनची दुकाने, सार्वजनिक स्वच्छतागृह वाढवणार, देवनार डंम्पिंग ग्राऊंड येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प, मलनिःसारण वाहिन्यांची व्याप्ती वाढवणार, रात्रीसुद्धा कचरा उचलण्याची सोय, मुंबईकरांना 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई, पिंजाळ प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावणार आदींचा समावेश आहे.

सेना भवनात वचननामा प्रसिध्द
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाभवनात मुंबईसाठी वचननामा जाहीर केला. महिन्याभराने सर्व महापालिकांवर सेनेचा भगवा फडकलेला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘डिड यू नो..’ या टॅगलाईनमुळे निर्माण झालेली प्रतिक्रिया पाहून लगेचच शिवसेनेने ‘बोलतो ते करून दाखवतो’, या टॅगलाईनखाली शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांचे नाव न घेता त्यांनी भाजपावर हल्ला चढवला. पक्षात माफियांना घेऊन फिरणारे माफियांबद्दल बोलतात. योग्यवेळी शिवसेनेवरच्या सर्व आरोपांना खणखणीत उत्तर देऊ, असेही ठाकरे म्हणाले.

काँग्रेसचा पुनरावृत्तीचा आरोप
शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली. शिवसेनेने मागील मनपा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे पुन्हा यंदाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे शिवसेनेने ‘रिपिट करून दाखवलं’, अशी टीका विखे पाटील यांनी केली. विरोधी पक्षात असताना शिवसेनेने शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना 50 हजार कोटींचं पॅकेज देण्याची मागणी केली होती. खड्डेमुक्त मुंबई करण्याचे स्वप्न दाखवले होते. परंतु, सत्तेत आल्यानंतर यातील एकही आश्वासन शिवसेनेला पूर्ण करता आले नाही. त्यासाठी त्यांना शेतकरीद्रोही, जनताद्रोही नाही तर आणखी काय म्हणायचं? अशीही विचारणा विखे पाटील यांनी केली.