मुंबई – राज्यातील महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजप मधील ताणलेले संबंध, आणि नुकतीच पार पडलेली एनडीएची बैठक या पार्श्ववभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचे व्हेंटीलेटरवरील संबंध कासवगतीने सुखरूप आहेत असे फिल्मी स्टाईल प्रतिक्रिया मीडियाला दिली. त्यामुळे सेना भाजपचे पॅचअप झाल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी कलावंतांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ममातोश्रीफ येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी उद्धव यांनी राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांचे कौतुक केलं. व्हेंटलेटरवर असलेल्या युती बाबत पत्रकारांनी उद्धव याना छेडले असता, सुवर्ण कमळ जिंकलेल्या कासव सिनेमाचा आधार घेत कासव गतीने सुखरूप असल्याचे मार्मिक उत्तर त्यांनी दिले. जगात कौतुक होत असलेल्या कलाकारांच्या घरात कौतुक व्हायला हवे असेही ते म्हणाले. मुंबईत मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्याची संकल्पना त्यांनी यावेळी मांडली. राज्याच्या सत्तेत सहभागी असतानाही गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेने भाजपबरोबर नेहमीच विरोधाची भूमिका घेतली होती. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने युती तोडून शिवसेना भाजप आमने सामने लढले.
एकमेकांविरोधात दंड थोपटल्याने युतीत दारार निर्माण झाला होता. युती तुटणार, सरकार कोसळणार इथपर्यंत चर्चा रंगल्या होत्या. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बोलावण्यात आले होते. मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहतील कि नाही याबाबत अशी शंका व्यक्त केली जात होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा हवा असेल तर मातोश्रीवर चर्चेला यावे लागेल अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ठाकरे याना फोन केल्यानंतर उद्धव ठाकरे बैठकीस उपस्थित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सोबत त्यांनी स्नेह भोजन घेतले. त्यावेळीच शिवसेना भाजपमधील कटुता संपल्याचे दिसून आले होते .आजच्या प्रतिक्रियेने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा
कुलभूषण जाधव यांच्याबाबत फक्त पत्रव्यवहार करून काही होणार नाही, पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला पाहिजेफ, अशी कडक भूमिका त्यांनी यावेळी मांडली.