युतीच्या बैठकीकडे भाजप आमदार लक्ष्मण जगतापांनी फिरवली पाठ

0

बैठकीत निनावी पत्रकामुळे गोंधळ; ऐनवेळी झाली सारवासारव

पिंपरी चिंचवड ः खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकीय वैरी पुन्हा एकदा उघड झाली आहे. त्याचे झाले असे की, मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील भाजप-शिवसेना पदाधिकार्‍यांच्या रविवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीकडे भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाठ फिरविली. बैठकीपूर्वी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपस्थिती लावली. मात्र, बैठकीतून त्यांना माघार घेतली. त्यामुळे युती झाली तरी शिवसेना खासदार, संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातील वैर पुन्हा एकदा समोर आले आहे.

आकुर्डीत झाली बैठक…
पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील भाजप-शिवसेना पदाधिकार्‍यांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत मंगळवारी आकुर्डीत बैठक झाली. शिवसेना उपनेत्या नीलम गोर्‍हे, महापौर राहुल जाधव, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, मावळचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बारणे हेच संभाव्य उमेदवार…
मावळातून शिवसेनेची उमेदवारी श्रीरंग बारणे यांना निश्‍चित आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांपूर्वी मावळात काम सुरु करण्याचा आदेश दिला आहे. चार दिवसांपूर्वी पनवेलमध्ये झालेल्या मेळाव्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देखील बारणे हेच उमेदवार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही, असे बारणे यांनी म्हटले आहे. आमदार लक्ष्मण जगताप बैठकीला अनुउपस्थित असल्याबाबत विचारले असता पालकमंत्री गिरीश बापट यांनी याबाबत सारवासारव केली. जगताप परवानगी घेऊन बाहेरच्या कामाकरिता गेले आहेत. दोन दिवस अगोदर माझी परवानगी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत बारणेंची झोप उडविणारी पत्रकाबाजी…
युतीच्या पदाधिकारी मेळाव्यात शिवसेनेचे मावळ लोकसभेचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविषयीचा एक मजकूर लिहिलेले पत्रक वाटण्यात आले. बारणे यांच्या समर्थकांनी ते पत्रक तातडीने फाडून गोळाही केले. मात्र त्यातील मजकूर बारणे यांची झोप उडविणारा आहे. श्रीरंगाचे हात दाखवून अवलक्षण! असे शीर्षक देवून हे पत्रक वाटण्यात आले आहे. तसेच, नरेंद्र मोदींसाठी एक एक सीट महत्वाचे असून अशा उमेदवाराला तिकीट देवून युतीचे कधीही भरुन न निघणारे हे नुकसान असल्याचे ही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. युतीचा खंदा समर्थक आणि मोदी साहेबांचा चाहता म्हणून हाताच्या कंकणाला आरसा कशाला म्हणून हा सर्व मागोवा आपण समोर ठेवत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र…असा आशय देवून पत्रकाचा शेवट करण्यात आला आहे.