अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे त्यानंतरच्या काळात राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ही लाट ओसरलेली पाहायला मिळेल, या आशेने राज्यातील युती सरकारमधील शिवसेनेने भाजपला राजकिय धडा शिकवण्यासाठी स्वतंत्र निवडणुका लढवण्याची घोषणा करत चांगलीच लढत दिली. मात्र, राज्यातील जनतेने अडीच वर्षांनंतरही पहिली पसंती भाजपला तर दुसरी शिवसेनेला दिली. त्यामुळे धडा शिकवण्याऐवजी शिवसेनेला स्वत:चेच आत्मपरीक्षण करून भाजपविरोधातील तलवार तात्पुरत्या स्वरूपात म्यान करावी लागली.
त्यातच या निवडणुकांमध्ये राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या दोन्ही पक्षांना रोखण्यात पुरेसे यश आले नाही. त्यामुळे सद्यपरिस्थितीत आणि पुढील दोन वर्षांत भाजपवर राजकीय कुरघोडी करता येत नसल्याने या दोन्ही विरोधी पक्षांबरोबरच शिवसेनेने 2019 च्या निवडणुकांची तयारी आतापासूनच करायला सुरुवात केली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या कानाकोपर्यात कधीकाळी असलेले गड पुन्हा आपल्या हाती घेण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीतील नाराज असलेल्यांना चुचकारण्याचे काम शिवसेनेने सुरू केले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह कोकणातील गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेकडून या भागात वरचष्मा असलेले नेत्यांना चुचकारणे सुरू केले आहे. त्यात सध्या तुरुंगात असलेले आणि शिवसेनेत बंडखोरी करून काँग्रेसवासी झालेले आणि राष्ट्रवादीमय झालेले छगन भुजबळ, नवी मुंबईचे गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या या राजकीय खेळींशी पुरते ओळखून असलेल्या भाजपनेही शिवसेनेला बाजूला सारत राज्यात 2019च्या निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता आणण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. भाजपला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातही यंदा खाते उघडत स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सत्ता राबवण्याची संधी मिळाली. मात्र, कोकणात सर्वाधिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपप्रणीत संघटनांचे जाळे असूनही कोकणात भाजपला राजकीय विस्तार करता आला नाही. त्यामुळे कोकणात पक्षाच्या विस्तारासाठी खमक्या नेत्यांची गरज भाजपला जाणवत आहे. त्या दृष्टिकोनातूनच काँग्रेसचे सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे तसेच काँग्रेसमध्ये ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत. त्या गोष्टी देण्याचे आश्वासन नारायण राणे यांना देण्यात येत आहे.
सध्या बदलत्या राजकीय वातावरणात स्वत:चे राजकीय अस्तित्व राखण्यासाठी इतर राजकीय नेत्यांप्रमाणे नारायण राणे हेही इतर पक्षांमध्ये जाण्याचे तपासून पाहत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्यांच्या घरवापसीबाबत स्पष्टपणे नकार कळवल्याची चर्चा आहे. त्यामुळे राणे यांनी इतर पक्षांची दरवाजे तपासून पाह्यला सुरुवात केली.
कोकणात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपकडूनही नारायण राणे यांना पद्धतशीर जवळ करण्यात येत आहे. त्यामुळे ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात नारायण राणे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकाही झाल्या. मात्र, त्यात अंतिम तोडगा निघू शकला नाही. अखेर नारायण राणे यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या दरबारात हजर करून यावर अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या जरी या दोघांच्या बैठकीतील तपशील गुलदस्त्यात असला, तरी राणे यांचा भाजप प्रवेश नक्की मानण्यात येत आहे. त्यास भाजपच्या संघनात्मक पदाधिकार्यांकडूनही दुजोरा दिला जात आहे. नारायण राणे यांनीही याबाबत अद्याप बोलण्याचे स्पष्टपणे बोलण्याचे टाळले असले, तरी भाजपमध्ये जाणार नसल्याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश हे उघड सत्य बनले आहे.
काँग्रेसमधील नारायण राणे यांच्याव्यतिरिक्त विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोस्ताना उघड आहे. त्यामुळे त्यांच्याहीबाबत मध्यंतरीच्या कालावधीत अशाच पक्षांतराच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या सख्ख्या चुलत भावाने त्यांच्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांना एका प्रकरणात मोठी मदत केल्याचा आरोप केला. त्यावर अद्याप विखे-पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी त्याबाबत नकारघंटाही वाजवली नाही. त्यामुळे भविष्यकाळात योग्यवेळी त्यांचाही भाजप पक्षप्रवेश निश्चित मानण्यात येत आहे. 2019च्या निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता आणण्याच्या दृष्टिकोनातून भाजप आणि शिवसेनेने आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले असताना राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप पुरेशी तयारी सुरू झालेली दिसून येत नाही. गेल्या अडीच वर्षांत या दोन्ही पक्षांना तगडा विरोधी पक्ष म्हणून राज्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात अपयश आले आहे. तसेच विसंवादाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नारायण राणे असून, अशा गोष्टींचा परिणाम संघटनात्मक पातळीवर होत आहे. एकेकाळी तळागाळात पोहोचलेल्या काँग्रेसला आता कार्यकर्तेही मिळेनासे झाले असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
दुसर्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या बेभरवशाच्या राजकारणामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीमुळे पवार यांना उपराष्ट्रपतीपद देण्याची चर्चा भाजपमधून पसरवण्यात आली आहे तसेच संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाची सूत्रे अजित पवार यांच्या हाती देण्याऐवजी कन्या सुप्रिया सुळे यांच्या हाती देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार आणि नेत्यांना राजकीय अनिश्चितता जाणवत असल्याने त्यांच्याकडून राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी भाजप किंवा शिवसेनेचा पर्याय स्वीकारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांकडून पक्षांतर करत राजकारणातील राजकीय आश्चर्याचे धक्के बसण्याची चिन्हे अधिक!
गिरिराज सावंत – 9833242586