शिर्डी: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी २५ वर्षापासूनची भाजप सेनेची युती युती तुटल्याची घोषणा भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीट नाकारत लांब ठेवले. भाजपाने त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले आहे. दरम्यान आज बुधवारी ६ रोजी खडसे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना शिवसेना, भाजपामध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाबाबत प्रश्न विचारले. त्यावर शिवसेना, भाजप युतीमध्ये मध्यस्थी करण्याइतका मी मोठा आता राहिलेलो नाही असे म्हणत उद्विग्नता व्यक्त केली.
‘दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी काय ठरले याची मला कल्पना नाही. त्यामुळे याबद्दल मी फारसे भाष्य करू शकत नाही. मात्र शिवसेनेची मागणी स्वाभाविक आहे. दोन्ही पक्षांमध्ये ठरल्याप्रमाणे व्हायला हवे’, असे म्हणत त्यांनी राज्यात महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपानं एकनाथ खडसेंना तिकीट नाकारले. त्यांच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला.