युतीसाठी सेनेपुढे झुकणार नाही;अमित शहांची आक्रमक भूमिका

0

नवी दिल्ली: भाजप-शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत अद्याप काहीही निश्चित नाही. मात्र शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात युती करायची असल्यास आम्ही झुकणार नाही असे अमित शहा यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपा खासदारांची बैठक घेतली. त्यावेळी शहांनी युतीबद्दलची आपली भूमिका मांडली.

बिहारमध्ये भाजपाने मित्रपक्षांसाठी स्वत:च्या कोट्यातील काही जागा सोडल्या. त्यामुळे संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टीला मोठा फायदा झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनादेखील भाजपावर दबाव वाढवून अधिकच्या जागा पदरात पाडून घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र ही शक्यता शहांनी पूर्णपणे फेटाळून लावली.

महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघांमध्ये लढण्याची आमची तयारी आहे. मात्र आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहू, असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश यावेळी त्यांनी खासदारांना दिले. मतदारसंघात जा आणि मतदारांना जास्तीत जास्त वेळ द्या, अशा सूचना त्यांनी खासदारांना दिल्या.